विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०२० वर्षात आपला पहिला परदेश दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाला कडवी टक्कर मिळाली आहे. ऑकलंडच्या मैदानावर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत २०३ धावांचा डोंगर उभा केला. नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला.

कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील यांनी आक्रमक फटकेबाजी करत संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ८० धावांची भागीदारी झाली. सलामीची जोडी भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच, शिवम दुबेने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. रोहित शर्माने गप्टीला सीमारेषेवर एक हाती झेल पकडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला.

दरम्यान, भारताकडून जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, शिवम दुबे आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.