कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला अखेरीस आपल्या पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात, यजमान संघाने भारतावर १० गडी राखून मात केली. दोन्ही डावांत भारतीय फलंदाजांकडून झालेली निराशाजनक कामगिरी हे भारतीय संघाच्या पराभवाचं प्रमुख कारण सांगितलं जातंय. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मयांक अग्रवालसोबत सलामीला येण्याची संधी मिळालेला पृथ्वी शॉ दोन्ही डावांत फारशी चमक दाखवू शकला नाही. सोशल मीडियावर दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलला संधी देण्यात यावी अशी मागणी सुरु झालेली आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : कर्णधार विराट कोहलीने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण…

मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पृथ्वी शॉची पाठराखण केली आहे. “दोन डावांमधील कामगिरीनंतर पृथ्वी शॉच्या कामगिरीवर टीका करणं थोडंस चूकीचं ठरेल. तो परदेशात फार कमी कसोटी सामने खेळला आहे. मात्र तो यामधूनही मार्ग काढेल, याची मला खात्री आहे. तो चांगला फलंदाज आहे, त्याचे फटके पाहण्यासारखे असतात. एकदा सुरात आला की त्याला थांबवता येत नाही.”

मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही फलंदाजांनी इतर फलंदाजांच्या तुलनेत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा नेटाने सामना केला. मयांक अग्रवालने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावत मोलाची भूमिका बजावली. पहिल्या सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतला अखेरचा सामना २९ फेब्रुवारीपासून ख्राईस्टचर्च येथे खेळवला जाणार आहे.