भारताविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात न्यूझीलंडने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळात, अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला शतकी आघाडी मिळवून देण्यात मदत केली. कॉलिन डी-ग्रँडहोम, जेमिसन यांनी फटकेबाजी करत आपल्या संघाची बाजू वरचढ ठेवली. यादरम्यान भारतीय संघासाठी एक गोष्ट चांगली घडलेली आहे.

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच, जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक बी.जे.वॉटलिंगला माघारी धाडलं. या सामन्यातला बुमराहचा हा पहिला बळी होता. महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात टीम साऊदीचा बळी घेतल्यानंतर, बुमराहला आपला पहिला बळी मिळवण्यासाठी दीर्घ काळ वाट पहावी लागली.

न्यूझीलंडविरुद्घ वन-डे मालिकेत बुमराहची बळींची पाटी कोरीच राहिली. यामुळे भारतीय संघाला वन-डे मालिकेत ३-० अशा पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे टी-२० मालिकेनंतर आपला पहिला बळी मिळवण्यासाठी बुमराहला तब्बल ४९ षटकांची वाट पहावी लागली. दरम्यान पहिल्या डावात न्यूझीलंडने ३४८ धावांपर्यंत मजल मारत १८३ धावांची आघाडी घेतली आहे.