रॉस टेलरने अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत झळकावलेल्या नाबाद ७३ धावांच्या जोरावर…न्यूझीलंडने दुसऱ्या वन-डे सामन्यात २७३ धावांपर्यंत मजल मारली आहे. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र सलामीची जोडी फुटल्यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकल्या. यावेळी रॉस टेलरने अखेरपर्यंत किल्ला लढवत ठेवत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.

अवश्य वाचा – Video : सर जाडेजांचा अचूक थ्रो आणि फलंदाज माघारी

टेलरने ७४ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली. या अर्धशतकी खेळीदरम्यान टेलर वन-डे क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणारा न्यूझीलंड फलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध ही त्याची ११ वेळी अर्धशतकी खेळी होती.

रॉस टेलरव्यतिरीक्त सलामीवीर मार्टीन गप्टीलने ७९ तर हेन्नी निकोल्सने ४१ धावा करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. भारताकडून युजवेंद्र चहलने ३, शार्दुल ठाकूरने २ तर रविंद्र जाडेजाने १ बळी घेतला. न्यूझीलंडचे दोन फलंदाज धावबाद झाले.