विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवीन वर्षाची सुरुवात धडाकेबाज केली आहे. घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही भारताने पहिले २ टी-२० सामने जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुलने या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : सलग दुसऱ्या सामन्यात लोकेश राहुलचा डंका, अनोख्या विक्रमाची नोंद

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत भारतीय संघात यष्टीरक्षणाची संधी मिळालेल्या राहुलने फलंदाजीसोबत यष्टीरक्षणातही चमकदार कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याच्या यष्टीरक्षकांच्या यादीत राहुलने महेंद्रसिंह धोनीची बरोबरी केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या काही महिन्यांमध्ये ऋषभ पंतला वारंवार संधी देऊनही तो अपयशी झाला. मात्र राहुलने आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारे भारतीय यष्टीरक्षक –

  • महेंद्रसिंह धोनी – २
  • लोकेश राहुल – २
  • ऋषभ पंत – १

दरम्यान न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा काढून माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र टीम साऊदीच्या गोलंदाजीवर विराट यष्टीरक्षक सेफर्टकडे झेल देऊन माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरत महत्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली. श्रेयस अय्यर विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि शिवम दुबेने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.