सलामीवीर मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने अखेरच्या वन-डे सामन्यातही बाजी मारली आहे. भारताने विजयासाठी दिेलेलं २९७ धावांचं आव्हान न्यूझीलंडने ५ गडी राखत पूर्ण केलं. या विजयासह न्यूझीलंडने वन-डे मालिकेत भारताला व्हाईटवॉश दिला असून, टी-२० मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : सलग तिसऱ्या सामन्यात विराट अपयशी

सामना गमावल्यानंतर विराट कोहलीने आपला पराभव मान्य केला. “पहिल्या सामन्यात आम्हाला विजयाची संधी होती. मात्र उरलेल्या दोन्ही सामन्यात त्यांनी आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली. आमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं नाही, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दर्जाचा खेळ झाला नाही. काही सामन्यांत आम्ही चांगली कामगिरी केली ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. मात्र न्यूझीलंडने प्रत्येक सामन्यात आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता आम्ही विजयासाठी लायक नव्हतो.” विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

गप्टील आणि निकोल्स यांनी पहिल्या विकेटसाठी दमदार सुरुवात केली. १०६ धावांच्या भागीदारीदरम्यान गप्टीलने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अखेरीस युजवेंद्र चहलने गप्टीलला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्याने ४६ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह ६६ धावा केल्या. यानंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांना झटपट माघारी धाडण्यात भारताला यश आलं. मात्र निकोल्सने एक बाजू सांभाळून धरत सामना न्यूझीलंडच्या हातातून निसटणार नाही याची काळजी घेतली.

शार्दुल ठाकूरने निकोल्सला माघारी धाडत न्यूझीलंडला धक्का दिला. त्याने ८० धावांची खेळी केली. मधल्या फळीत जिमी निशमही स्वस्तात माघारी परतला. यानंतर टॉम लॅथम आणि कॉलिन डी-ग्रँडहोमने फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. डी-ग्रँडहोमने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत नाबाद ५८ धावा केल्या. भारताकडून युजवेंद्र चहलने ३, तर रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

अवश्य वाचा – पृथ्वी शॉला फिटनेसवर काम करण्याची गरज, माजी भारतीय खेळाडूचा सल्ला