अनुभवी खेळाडूंना दिलेल्या विश्रांतीनंतरही भारतीय संघाने तरुण खेळाडूंच्या साथीने चौथ्या टी-२० सामन्यात बाजी मारत, आपली आघाडी ४-० ने वाढवली आहे. सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सामना अनिर्णित राखून सुपरओव्हरमध्ये विजय मिळवला. फलंदाजीत मनिष पांडे, तर गोलंदाजीत शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

सलामीवीर लोकेश राहुलनेही या सामन्यात विराट कोहलीचा विक्रम मोडला. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना राहुलने २६ चेंडूत ३ चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने ३९ धावा केल्या. यादरम्यान लोकेश राहुलने टी-२० प्रकारात ४ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. केवळ ११७ डावांमध्ये राहुलने ही कामगिरी करत आपला कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला.

याचसोबत नवीन वर्षात टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून भारताची सुरुवातही चांगली झालेली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहाही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. दरम्यान या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकल्यास भारताला न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. टी-२० मालिकेनंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.