भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात ७ धावांनी विजय मिळवत मालिकेत ५-० ने बाजी मारली. अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेणं पसंत केलं. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही खांद्याला झालेल्या दुखापतीमधून न सावरु शकल्यामुळे खेळला नाही.

अवश्य वाचा – Ind vs NZ : कर्णधार विराटच्या नावावर अनोखा विक्रम, आफ्रिकेच्या डु-प्लेसिसला टाकलं मागे

मात्र सामन्यादरम्यान विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यातला अनोखा याराना सर्वांना पहायला मिळाला. राखीव खेळाडूची जर्सी घालून विराट आणि केन विल्यमसन सीमारेषेबाहेर बसून निवांत गप्पा मारताना दिसले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. फलंदाजीदरम्यान रोहित शर्मालाही दुखापत झाल्यामुळे नंतरच्या सत्रात लोकेश राहुलने कर्णधारपदाची भूमिका बजावली. मालिकेत बाजी मारल्यानंतर विराटनेही केन विल्यमसनच्या झुंजार वृत्तीचं कौतुक केलं.

अवश्य वाचा – एका फटक्यात सगळे हिशोब चुकते ! न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडियाने रचला इतिहास

“केन आणि मी एकसारखाच विचार करतो. खेळाकडे बघण्याचा आम्हा दोघांचा दृष्टीकोनही सारखाच आहे. दोन वेगवेगळ्या देशांकडून खेळत असूनही आम्हा दोघांचे विचार हे मिळते-जुळते आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. या मालिकेचा निकाल काहीही असो, पण माझ्यामते न्यूझीलंड क्रिकेटचं भवितव्य केन विल्यमसनच्या हाती सुरक्षित आहे, तो न्यूझीलंडसाठी योग्य कर्णधार आहे.” टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.