न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एक दिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली आणि भारताचा डाव अवघ्या ९२ धावांवर आटोपला. न्यूझीलंडने या सामन्यात भारतावर आठ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

वन डे इतिहासातील भारतीय संघाची ही सातवी नीचांकी धावसंख्या आहे. तर न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला दुसऱ्यांदा शंभर धावांचा पल्ला ओलांडता आला नाही.  यापूर्वी २०१० मध्ये देखील न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाचा डाव ८८ धावांवर आटोपला होता.

भारताची वन डेतील नीचांकी धावसंख्या

> ऑक्टोबर २००० मध्ये शारजा येथे श्रीलंकेविरोधात खेळताना भारतीय संघ अवघ्या ५४ धावांवर माघारी परतला होता. वन डे इतिहासात भारताची ही नीचांकी धावसंख्या आहे. श्रीलंकेचे ३०० धावांचे लक्ष्य गाठताना भारताचे सर्व गडी ५४ धावांमध्ये माघारी परतले होते. श्रीलंकेने या सामन्यात २४५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

> जानेवारी १९८१ मध्ये सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतीय संघ ६३ धावांमध्येच माघारी परतला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता.

> डिसेंबर १९८६ मध्ये कानपूर येथे श्रीलंकेविरोधात खेळताना भारताने वन डे इतिहासातील तिसरी नीचांकी धावसंख्या नोंदवली. या सामन्यात भारतीय संघ ७८ धावांवर माघारी परतला होता. श्रीलंकेचे १९६ धावांचे आव्हान गाठताना भारतावर ही परिस्थिती ओढावली होती. श्रीलंकेने सामन्यात ११७ धावांनी विजय मिळवला होता.

> ऑक्टोबर १९७८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ ७९ धावांवर तंबूत  परतला होता. सियालकोट येथे हा सामना रंगला होता. भारताचे ७९ धावांचे माफक आव्हान पाकिस्तानी संघाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात गाठले होते.

> ऑगस्ट २०१० मध्ये दंबुल्ला येथे न्यूझीलंडविरोधात खेळताना भारताचा डाव ८८ धावांवर आटोपला होता. न्यूझीलंडचे २८९ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते.

> नोव्हेंबर २००६ रोजी डरबन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना भारतीय संघ ९१ धावांवर माघारी परतला होता. दक्षिण आफ्रिकेचे २४९ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय संघ २९. १ षटकांत ९१ धावांवर माघारी परतला.