शंभरीच्या आत निम्मा संघ तंबूत परतूनही, कर्णधार ब्रॅन्डन मॅकलमने झुंजार शतक झळकवत न्यूझीलंडचा डावाने पराभव टाळला.  त्यामुळे डावाने विजय मिळविण्याची संधी असलेल्या भारताला आता दुसऱ्या डावातही मैदानावर उतरावे लागणार आहे. न्यूझीलंडचे पाच फलंदाज झटपट बाद करणाऱ्या भारताच्या गोलंदाजांना त्यानंतर यश मिळविता आले नाही.  न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद २५२ धावा केल्या असून,  भारतावर सहा धावांची आघाडी मिळविली आहे.
मॅकलम (११४) तर, वॉटलिंग (५२) धावांवर नाबाद आहे. भारताकडे २४६ धावांची आघाडी होती. सकाळच्या सत्रात प्रभावी गोलंदाजी करुन, न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना शंभरीच्या आत तंबूत धाडणारे भारतीय गोलंदाज मात्र नंतर निष्प्रभ ठरले. मॅकलम आणि वॉटलिंगने संयमाने फलंदाजी करत न्यूझीलंडवरील पराभवाचे संकट टाळले. उद्या भारतीय गोलंदाजांना या दोघांना लवकरात लवकर बाद करून न्यूझीलंडचा डाव झटपट गुंडाळावा लागणार आहे. नाही तर, भारतासाठी सहज वाटणारा विजय कठिण होऊ शकतो किंवा सामनाही न्यूझीलंडच्या बाजूने झुकू शकतो.