भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दुसर्‍या दिवशीही खराब वातावरणामुळे चाहत्यांना निराशा व्हावे लागले. साऊथम्प्टनमधील या ऐतिहासिक सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे पूर्णपणे धुऊन गेला. दुसर्‍या दिवशी केवळ ६४.४ षटके खेळली गेली आणि अंधूक प्रकाशामुळे सामना अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याचे जाहीर केले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. यानंतर खराब प्रकाशामुळे खेळ तीन वेळा थांबवावा लागला. इतकेच नव्हे, तर टी-ब्रेकही लवकर घेण्यात आला. खेळ थांबला तेव्हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (४४) आणि अजिंक्य रहाणे (२९) नाबाद होते. या दोघांमध्ये ५८ धावांची भागीदारी झाली आहे.

भारताचा डाव

भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची आश्वासक सुरुवात केली. ६१ धावांवर भारताने आपला पहिला गडी रोहितच्या रुपात गमावला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने रोहितला बाद केले. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या साऊदीने रोहितचा झेल टिपला. रोहितने ६ चौकारांसह ३४ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर एका धावेच्या फरकाने शुबमन माघारी परतला. नील वॅग्नरने शुबमनला वॉटलिंगकरवी झेलबाद केले. शुबमनने २८ धावा केल्या. या दोघानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सांभाळायचा प्रयत्न केला, पण उपाहारानंतर भारताने अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराला गमावले.

हेही वाचा – ‘‘तो एक अद्भुत व्यक्ती’’, WTC फायनलपूर्वी विराटनं केलं विल्यमसनचं तोंडभरून कौतुक

ट्रेंट बोल्टने पुजाराला वैयक्तिक ८ धावांवर पायचित पकडले. पुजारानंतर मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे मैदानात आला. विराट आणि अजिंक्यने भारताला शंभरीपार नेले. तिसऱ्या सत्रात काही वेळ अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात.  काही वेळानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. दरम्यान विराट आणि अजिंक्यने भारतासाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. काही षटके खेळल्यानंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. यानंतर खेळ होणार नसल्याचे पंचानी जाहीर केले. विराट कोहली एका चौकारासह ४४ तर अजिंक्य ४ चौकारांसह २९ धावांवर नाबाद राहिला आहे.