भारतासह संपूर्ण जग ज्या सामन्याची वाट पाहत होते, तो  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून  सुरू होणार होता, मात्र पावसाने हजेरी लावल्याने या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघात नाणेफकही होऊ शकली नाही.   कसोटी क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या या स्पर्धेमध्ये पावसाने अडथळा आणला. साऊथम्प्टनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना होत खेळवण्यात येणार आहे.

जर सामन्याच्या दुसर्‍या दिवशी हवामान अनुकूल असेल तर नाणेफेक वेळेवर होईल. सामन्याचा राखीव दिवसही वापरला जाईल, म्हणजे जर हवामान चांगले असेल तर सामना संपूर्ण पाच  दिवसांचा असेल. प्रत्येक दिवशी ९८ षटकांचा खेळ खेळला जाईल.

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आतापर्यंत एकूण ५९ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी भारताने २१ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने १२ सामने जिंकले आहेत. अनिर्णीत सामन्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २६ इतकी आहे.

दोन्ही संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डीग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जॅमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, इजाज पटेल, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग.

> कोणत्या वाहिन्यांवर पाहता येणार सामना?

स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्यावरुन या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे.

> ऑनलाइन कुठे पाहता येईल हा सामना?

डिस्ने हॉटस्टारवर हा सामना लाइव्ह पाहता येणार आहे. सबस्क्रीप्शन असणाऱ्या युझर्सला हा सामना लाइव्ह पाहता येईल.

Live Blog

19:51 (IST)18 Jun 2021
पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द

पंचानी मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना सुरू करणे शक्य होणार नसल्याचे समोर आले. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. 

18:36 (IST)18 Jun 2021
पंच करणार मैदानाची पाहणी

साऊथम्प्टनमध्ये पावसाचा जोर पाहता साडे सात वाजता पंच मैदानाची पाहणी करणार आहेत. लंच ब्रेकनंतरही पावसामुळे खेळ होऊ शकलेला नाही. 

17:30 (IST)18 Jun 2021
पुन्हा पावसाचे आगमन

साऊथम्प्टनमध्ये काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा आपले दर्शन घडवले आहे. 

17:28 (IST)18 Jun 2021
लंच ब्रेक, साऊथम्प्टनमध्ये पाऊस थांबला

साऊथम्प्टनमध्ये पाऊस थांबला आहे. पण खेळ कधी सुरू होणार याचा निर्णय झालेला नाही, सामन्याच्या वेळानुसार लंच ब्रेक झाला आहे.

14:34 (IST)18 Jun 2021
पहिल्या सत्राचा खेळ वाया

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला पावसाचे ग्रहण लागले आहे.  बीसीसीआयने केलेल्या ट्वीटनुसार पहिल्या सत्रात खेळ होणार नाही. 

14:30 (IST)18 Jun 2021
पावसामुळे नाणेफेकीला विलंब

साऊथम्प्टनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात  पावसाचे जोरदार आगमन झाल्यामुळे  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामन्यातील नाणेफेकीला विलंब झाला आहे.