News Flash

WTC Final Day 3 : तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडच्या २ बाद १०१ धावा

केन विल्यमसन आणि रॉस टेलरची जोडी नाबाद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२१

पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला कालपासून सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि केन विल्यमसनने  प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवशी भारताने १४६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारत पहिल्या डावात ९२.१ षटकात २१७ धावा करू शकला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने पाच बळी घेत भारताच्या डावाला सुरूंग लावला. यानंतर न्यूझीलंडने आपल्या डावाला सुरुवात केली. सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसअखेर २ बाद १०१ धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडचा पहिला डाव

टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला आणि पहिल्या डावाला सुरुवात केली. इंशात शर्माने भारताकडून पहिले षटक टाकले. चहापानापर्यंत न्यूझीलंडने २१ षटके खेळली, यात त्यांनी बिनबाद ३६ धावा केल्या. चहापानानंतर लॅथम-कॉन्वे यांनी २७व्या षटकात न्यूझीलंडचे अर्धशतक फलकावर लावले. खेळपट्टीवर स्थिरावलेला न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला अश्विनने माघारी धाडले. लॅथमने ३० धावा केल्या. लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली. चांगल्या लयीत असलेल्या डेव्हन कॉन्वेने आपले ४४व्या षटकात आपले  अर्धशतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने डेव्हॉन कॉन्वेला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मोहम्मद शमीने कॉन्वेचा झेल टिपला. कॉन्वेने १५३ चेंडूचा सामना करत ६ चौकरांसह ५४ धावांची खेळी केली. त्याच्यानंतर कर्णधार केन विल्यमसनची साथ देण्यासाठी रॉस टेलर मैदानात आला. ४९ षटकानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा जमवल्या असून ते अजून ११६ धावांची पिछाडीवर आहेत. विल्यमसन १२ तर  रॉस टेलर शून्यावर नाबाद राहिला आहे.

भारताचा पहिला डाव

भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची आश्वासक सुरुवात केली. ६१ धावांवर भारताने आपला पहिला गडी रोहितच्या रुपात गमावला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने रोहितला बाद केले. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या साऊदीने रोहितचा झेल टिपला. रोहितने ६ चौकारांसह ३४ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर एका धावेच्या फरकाने शुबमन माघारी परतला. नील वॅगनरने शुबमनला वॉटलिंगकरवी झेलबाद केले. शुबमनने २८ धावा केल्या. या दोघानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सांभाळायचा प्रयत्न केला, पण उपाहारानंतर भारताने अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराला गमावले. ट्रेंट बोल्टने पुजाराला वैयक्तिक ८ धावांवर पायचित पकडले. पुजारानंतर मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे मैदानात आला. विराट आणि अजिंक्यने भारताला शंभरीपार नेले. तिसऱ्या सत्रात काही वेळ अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात.  काही वेळानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. दरम्यान विराट आणि अजिंक्यने भारतासाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. काही षटके खेळल्यानंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. यानंतर खेळ होणार नसल्याचे पंचानी जाहीर केले. विराट कोहली एका चौकारासह ४४ तर अजिंक्य ४ चौकारांसह २९ धावांवर नाबाद राहिला होता.

तिसऱ्या दिवशी  भारताने ३ बाद १४६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली.  खेळ सुरू होताच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने भारतीय कर्णधार विराट कोहलीला पायचित पकडले. विराट हा जेमीसनचा दुसरा बळी ठरला. विराटने ४४ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर भारताला ऋषभ पंतकडून  मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तिखट मारा करणाऱ्या जेमीसनने त्याला लॅथमकरवी झेलबाद केले. पंत ४ धावा काढून  माघारी परतला. विराटनंतर मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेचेही अर्धशतक हुकले. वेगवान गोलंदाज नील वॅगनरने त्याला लॅथमकरवी वैयक्तिक ४९ धावांवर बाद केले. त्यानंतर रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी भारताला दोनशेपार पोहोचवले. चांगल्या लयीत असलेला अश्विन टिम साऊदीचा बळी ठरला. ३ चौकारांसह २२ धावांची खेळी केल्यानंतर टिम साऊदीने अश्विनला माघारी धाडले. उपाहारानंतर जेमीसनने भारताला लागोपाठ दोन धक्के देत आपले पाच बळी पूर्ण केले. प्रथम त्याने इशांत शर्माला (४) त्यानंतर जसप्रीत बुमराहला (०) माघारी धाडले. ट्रेंट बोल्टने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला (१५) यष्टीपाठी झेलबाद करत भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलंडला वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने ३१ धावांत ५ बळी घेत भारताचा अर्धा संघ गारद केला. बोल्ट आणि वॅगनरला प्रत्येकी २ बळी घेतला आले.

दोन्ही संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोमे, काईल जेमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग.

> कोणत्या वाहिन्यांवर पाहता येणार सामना?

स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्यावरुन या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण केले जात आहे.

> ऑनलाइन कुठे पाहता येईल हा सामना?

डिस्ने हॉटस्टारवर हा सामना लाइव्ह पाहता येईल. सबस्क्रीप्शन असणाऱ्या युझर्सला हा सामना लाइव्ह पाहता येईल.

Live Blog
23:04 (IST)20 Jun 2021
तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडच्या २ बाद १०१ धावा

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने ४९ षटकात २ बाद १०१  धावा केल्या आहेत. कर्णधार केन विल्यमसन १२ तर  रॉस टेलर शून्यावर नाबाद राहिला आहे. न्यूझीलंडचा संघ अजून ११६ धावांनी पिछाडीवर आहे.

22:57 (IST)20 Jun 2021
न्यूझीलंडला दुसरा धक्का, कॉन्वे माघारी

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने डेव्हॉन कॉन्वेला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मोहम्मद शमीने कॉन्वेचा झेल टिपला. कॉन्वेने १५३ चेंडूचा सामना करत ६ चौकरांसह ५४ धावांची खेळी केली. त्याच्यानंतर कर्णधार केन विल्यमसनची साथ देण्यासाठी रॉस टेलर मैदानात आला आहे.

22:34 (IST)20 Jun 2021
सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेचे अर्धशतक पूर्ण

न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉन्वेने ४४व्या षटकात आपले  अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या तीन कसोटीच्या पहिल्या डावात कॉन्वेने अर्धशतक झळकावली आहेत. 

22:09 (IST)20 Jun 2021
भारताला पहिले यश, लॅथम बाद

खेळपट्टीवर स्थिरावलेला न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला अश्विनने माघारी धाडले. लॅथमने ३० धावा केल्या.लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली.

21:16 (IST)20 Jun 2021
न्यूझीलंडचे अर्धशतक पूर्ण

चहापानानंतर लॅथम-कॉन्वे यांनी २७व्या षटकात न्यूझीलंडचे अर्धशतक फलकावर लावले.

20:39 (IST)20 Jun 2021
चहापानापर्यंत न्यूझीलंडची सावध सुरुवात

चहापानापर्यंत न्यूझीलंडने २१ षटके खेळली, यात त्यांनी बिनबाद ३६ धावा केल्या आहेत. लॅथम १७ तर कॉन्वे १८ धावांवर नाबाद आहे.

18:52 (IST)20 Jun 2021
न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुवात

टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला आणि पहिल्या डावाला सुरुवात केली आहे. इंशात शर्माने भारताकडून पहिले षटक टाकले.

18:40 (IST)20 Jun 2021
भारताचा पहिला डाव संपुष्टात

ट्रेंट बोल्टने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला (१५) यष्टीपाठी झेलबाद करत भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलंडला वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने ३१ धावांत ५ बळी घेत भारताचा अर्धा संघ गारद केला. बोल्ट आणि वॅगनरला प्रत्येकी २ बळी घेतला आले.

18:30 (IST)20 Jun 2021
उपाहारानंतर जेमीसनचे भारताला लागोपाठ दोन धक्के

उपाहारानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने भारताला लागोपाठ दोन धक्के देत आपले पाच बळी पूर्ण केले. प्रथम त्याने इशांत शर्माला (४) त्यानंतर जसप्रीत बुमराहला (०) माघारी धाडले. 

17:35 (IST)20 Jun 2021
उपाहारापर्यंत भारत

भारताने तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत ८९ षटकात ७ बाद २११ धावा केल्या आहेत. या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने ६५ धावा करत ४ गडी गमावले. रवींद्र जडेजा १५ तर इशांत शर्मा २ धावांवर नाबाद आहे. 

17:21 (IST)20 Jun 2021
भारत दोनशेपार, अश्विन बाद

३ चौकारांसह २२ धावांची खेळी केल्यानंतर टिम साऊदीने अश्विनला माघारी धाडले. त्याची जागा घेण्यासाठी इशांत शर्मा मैदानात आला आहे. 

17:01 (IST)20 Jun 2021
मुंबईकर अजिंक्य रहाणेचेही अर्धशतक हुकले

विराटनंतर मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेचेही अर्धशतक हुकले. वेगवान गोलंदाज नील वॅगनरने त्याला लॅथमकरवी वैयक्तिक ४९ धावांवर बाद केले. रहाणेनंतर रवीचंद्रन अश्विन मैदानात आला आहे. 

16:18 (IST)20 Jun 2021
ऋषभ पंत स्वस्तात बाद

विराट बाद झाल्यानंतर भारताला ऋषभ पंतकडून  मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तिखट मारा करणाऱ्या जेमीसनने त्याला लॅथमकरवी झेलबाद केले. पंत ४ धावा काढून  माघारी परतला. पंतनंतर डावखुरा फलंदाज रवींद्र जडेजा मैदानात आला आहे.

15:50 (IST)20 Jun 2021
भारताचा कर्णधार माघारी

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने भारतीय कर्णधार विराट कोहलीला पायचित पकडले. विराट हा जेमीसनचा दुसरा बळी ठरला. विराटने ४४ धावा केल्या. त्याच्यानंतर ऋषभ पंत मैदानात आला आहे. 

15:41 (IST)20 Jun 2021
तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी फलंदाजीला मैदानात येत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली आहे. भारत कालच्या ३ बाद १४६ धावांपासून पुढे खेळत आहे.

Next Stories
1 कोहलीमुळे भारत सुस्थितीत!
2 भारतीय ऑलिम्पिकपटूंसाठी कडक नियमावली
3 झुंज संपली!
Just Now!
X