वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीच्या पाचव्या दिवसअखेर भारताने न्यूझीलंडसमोर ३२ धावांची आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी मोहम्मद शमी आणि इशांत शर्माच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा पहिला डाव ९९.२ षटकात २४९ धावांवर संपुष्टात आला. पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. उपाहारानंतर मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाहीत. त्याने ४ बळी घेतले, तर दीडशेपेक्षा जास्त चेंडू खेळणाऱ्या केन विल्यमसनने ४९ धावा करत संघाला आघाडी मिळवून दिली. भारताने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली असून संघाने ३० षटकात २ बाद ६४ अशी धावसंख्या उभारली आहे.

भारताचा दुसरा डाव

रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली. टिम साऊदीने भारताला पहिला धक्का देत शुबमन गिलला माघारी धाडले. साऊदीने गिलला वैयक्तिक ८ धावांवर पायचित पकडले. गिल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. रोहित आणि चेतेश्वरने २६व्या षटकात भारताचे अर्धशतक फलकावर लावले. साऊदीने भारताला दुसरा धक्का देत रोहित शर्माला माघारी धाडले. रोहितने ३० धावांची खेळी केली. रोहित बाद झाल्यानंतर कर्णधार विराट आणि चेतेश्वर पाचवा दिवस संपेपर्यंत नाबाद राहिले आहेत. विराट ८ तर चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद आहे.

न्यूझीलंडचा पहिला डाव

टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला आणि पहिल्या डावाला सुरुवात केली. इंशात शर्माने भारताकडून पहिले षटक टाकले. चहापानानंतर लॅथम-कॉन्वे यांनी २७व्या षटकात न्यूझीलंडचे अर्धशतक फलकावर लावले. खेळपट्टीवर स्थिरावलेला न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला अश्विनने माघारी धाडले. लॅथमने ३० धावा केल्या. लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी केली. चांगल्या लयीत असलेल्या डेव्हॉन कॉन्वेने आपले ४४व्या षटकात आपले  अर्धशतक पूर्ण केले. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कॉन्वेला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मोहम्मद शमीने कॉन्वेचा झेल टिपला. कॉन्वेने १५३ चेंडूचा सामना करत ६ चौकरांसह ५४ धावांची खेळी केली. त्याच्यानंतर कर्णधार केन विल्यमसनची साथ देण्यासाठी रॉस टेलर मैदानात आला. पाचव्या दिवशी मोहम्मद शमीने भारताला लवकर यश मिळवून दिले. टेलर वैयक्तिक ११ धावांवर झेलबाद झाला. शुबमन गिलने टेलरचा झेल घेतला. त्यानंतर इशांत शर्माने हेन्री निकोलसला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकरवी झेलबाद करत न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. निकोलसने ७ धावा केल्या. कारकिर्दीची शेवटची कसोटी खेळणाऱ्या बीजे वॉटलिंगही पहिल्या डावात काही खास करू शकला नाही. मोहम्मद शमीने त्याचा एका धावेवर त्रिफळा उडवला.

भारताने ८०व्या षटकानंतर नवा चेंडू घेतला. उपाहारानंतर मोहम्मद शमीने न्यूझीलंडला अजून एक हादरा दिला. शमीने त्याने कॉलिन डी ग्रँडहोमेला माघारी धाडले. त्यानंतर मैदानात आलेल्या काईल जेमीसनने झटपट २१ धावा काढल्या. मात्र तोही शमीचा बळी ठरला. ८९व्या षटकात न्यूझीलंडने आपले द्विशतक पूर्ण केले. कर्णधार केन विल्यमसनने न्यूझीलंडची एक बाजू लावून धरली. तब्बल १७७ चेंडूंचा सामना करत खेळपट्टीवर ठाण मांडून बसलेल्या विल्यमसनला इशांत शर्माने बाद केले. विल्यमसनने ६ चौकारांसह ४९ धावांची खेळी केली. टिम साऊदीने ३० धावांची खेळीत करत संघसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. फिरकीपटू रवींद्र जडेजाने ३० धावांची खेळी केलेल्या टिम साऊदीचा त्रिफळा उद्ध्वस्त करत न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ७६ धावात ४ बळी घेतले. तर इशांत शर्माने ३, जडेजाने २ आणि अश्विनने १ बळी घेतला.

भारताचा पहिला डाव

पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला १९ जूनपासून सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि केन विल्यमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवशी भारताने १४६ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली, पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे व्यतिरिक्त इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारत पहिल्या डावात ९२.१ षटकात २१७ धावा करू शकला. विराटने ४४ तर अजिंक्यने ४९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने ३१ धावांत ५ बळी घेत भारताच्या डावाला सुरूंग लावला.

दोन्ही संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोमे, काईल जेमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक).

> कोणत्या वाहिन्यांवर पाहता येणार सामना?

स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि एचडी वाहिन्यावरुन या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण केले जात आहे.

> ऑनलाइन कुठे पाहता येईल हा सामना?

डिस्ने हॉटस्टारवर हा सामना लाइव्ह पाहता येईल. सबस्क्रीप्शन असणाऱ्या युझर्सला हा सामना लाइव्ह पाहता येईल.

Live Blog

23:42 (IST)22 Jun 2021
पाचव्या दिवसाचा खेळ संपला

पाचव्या दिवसअखेर भारताकडे ३२ धावांची आघाडी आहे. कर्णधार विराट कोहली ८ तर चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद आहे.

23:15 (IST)22 Jun 2021
भारताला दुसरा धक्का, रोहित बाद

टिम साऊदीने भारताला दुसरा धक्का देत रोहित शर्माला माघारी धाडले. रोहितने ३० धावांची खेळी केली. रोहितनंतर विराट मैदानात आला आहे. 



23:10 (IST)22 Jun 2021
भारताचे अर्धशतक पूर्ण

रोहित आणि चेतेश्वरने २६व्या षटकात भारताचे अर्धशतक फलकावर लावले. भारताकडे अद्याप १९ धावांची आघाडी आहे.

22:02 (IST)22 Jun 2021
भारताला पहिला धक्का, गिल माघारी

टिम साऊदीने भारताला पहिला धक्का देत शुबमन गिलला माघारी धाडले. साऊदीने गिलला वैयक्तिक ८ धावांवर पायचित पकडले. गिल बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला आहे. 

21:23 (IST)22 Jun 2021
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात

रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली आहे. 

20:56 (IST)22 Jun 2021
न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात

फिरकीपटू रवींद्र जडेजाने ३० धावांची खेळी केलेल्या टिम साऊदीचा त्रिफळा उद्ध्वस्त करत न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडे ३२ धावांची आघाडी आहे. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ७६ धावात ४ बळी घेतले. तर इशांत शर्माने ३, जडेजाने २ आणि अश्विनने १ बळी घेतला.

20:39 (IST)22 Jun 2021
न्यूझीलंडचा नववा गडी माघारी

विराटने न्यूझीलंडच्या शेवटच्या फलंदाजांसाठी आर. अश्विनकडे चेंडू सोपवला. त्याने नील वॅगनरला शून्यावर बाद करत न्यूझीलंडला नववा धक्का दिला. त्याच्यानंतर ट्रेंट बोल्ट मैदानात आला आहे. 

20:28 (IST)22 Jun 2021
केन विल्यमसन ४९ धावांवर झेलबाद

तब्बल १७७ चेंडूंचा सामना करणाऱ्या केन विल्यमसनला इशांत शर्माने विराटकरवी झेलबाद केले. त्याने  ४९ धावांची खेळी केली. विल्यमसननंतर नील वॅगनर आणि टिम साऊदी मैदानात आहेत.

20:02 (IST)22 Jun 2021
न्यूझीलंडचे द्विशतक पूर्ण

८९व्या षटकात न्यूझीलंडने आपले द्विशतक पूर्ण केले. कर्णधार केन विल्यमसनने न्यूझीलंडची एक बाजू लावून धरली असून तो अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे. 

20:02 (IST)22 Jun 2021
न्यूझीलंडचे द्विशतक पूर्ण

८९व्या षटकात न्यूझीलंडने आपले द्विशतक पूर्ण केले. कर्णधार केन विल्यमसनने न्यूझीलंडची एक बाजू लावून धरली असून तो अर्धशतकाच्या जवळ पोहोचला आहे. 

19:54 (IST)22 Jun 2021
न्यूझीलंडचा सातवा गडी तंबूत

ग्रँडहोमेनंतर मैदानात फटकेबाजी करणाऱ्या काईल जेमीसनला मोहम्मद शमीने बाद केले. जेमीसनने २१ धावा केल्या. जेमीसन हा शमीचा चौथा बळी ठरला. 

19:24 (IST)22 Jun 2021
मोहम्मद शमीचा तिसरा बळी, ग्रँडहोमे बाद

भारताने ८०व्या षटकानंतर नवा चेंडू घेतला. या चेंडूने मोहम्मद शमीने कॉलिन डी ग्रँडहोमेला पायचित पकडले. ग्रँडहोमेला १३ धावा करता आल्या.

18:17 (IST)22 Jun 2021
उपाहारापर्यंत न्यूझीलंड

२ बाद १०१ धावांवरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडची उपाहारापर्यंत ५ बाद १३५ धावा अशी अवस्था झाली आहे. न्यूझीलंडचा संघ अजून ८२ धावांनी पिछाडीवर आहे. त्यांची भिस्त केन विल्यमसनवर असून तो १९ आणि ग्रँडहोमे शून्यावर नाबाद आहे.

17:56 (IST)22 Jun 2021
शमीकडून वॉटलिंगची दांडी गुल

एका धावेच्या अंतराने मोहम्मद शमीने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॉटलिंगची (१) दांडी गुल केली. न्यूझीलंडचे १३५ धावांवर ५ फलंदाज तंबूत परतले आहेत.

17:51 (IST)22 Jun 2021
न्यूझीलंडचा हेन्री निकोलस बाद

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने हेन्री निकोलसला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकरवी झेलबाद करत न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. निकोलसने ७ धावा केल्या. वॉटलिंग फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.

17:17 (IST)22 Jun 2021
न्यूझीलंडला तिसरा धक्का

मोहम्मद शमीने भारताला पाचव्या दिवशी लवकर यश मिळवून दिले. न्यूझीलंडचा रॉस टेलर वैयक्तिक ११ धावांवर झेलबाद झाला. शुबमन गिलने टेलरचा झेल घेतला. विल्यमसनची साथ देण्यासाठी हेन्री निकोलस मैदानात आला आहे.

17:11 (IST)22 Jun 2021
ड्रिंक्स ब्रेक

ड्रिंक्स ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने ६२ षटकात २ बाद ११७ धावा केल्या आहेत.  न्यूझीलंडचा संघ अजून १०० धावांनी पिछाडीवर आहे. 

16:05 (IST)22 Jun 2021
सामन्याला सुरुवात

पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. विल्यमसन १२, तर रॉस टेलर शून्यावर नाबाद  असून बुमराहने गोलंदाजीची सुरुवात केली आहे.

15:39 (IST)22 Jun 2021
पावसामुळे खेळ सुरू होण्यात व्यत्यय

आज हवामान चांगले असून पूर्ण दिवसाचा खेळ होणे अपेक्षित आहे.  पण पावसामुळे आणि त्यानंतर मैदान ओले झाल्यामुळे खेळ सुरू होण्यास विलंब झाला आहे.