News Flash

WTC Final Day 6 : न्यूझीलंडला ऐतिहासिक विजेतेपद, भारतावर ८ गड्यांनी केली मात

कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरची संघासाठी विजयी भागीदारी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल

अचूक रणनिती, संघातील खेळाडूंची योग्य निवड, प्रतिस्पर्ध्यांच्या कमकुवत बाजूंची माहिती आणि हवामानाचा अभ्यास या सर्व घटकांच्या जोरावर न्यूझीलंडने बलाढ्य भारताला ८ गड्यांनी पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. या सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. नाणेफेक जिंकलेल्या न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या डावात भारताला २१७ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने भारताला जखडून ठेवत १७० धावांवर गुंडाळले. राखीव दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून ५३ षटकात १३९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लॅथम आणि कॉन्वे लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

न्यूझीलंडचा दुसरा डाव

सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडकडून राखीव दिवसाच्या चहापानापर्यंत सावध सुरुवात केली. चहापानानंतर विराटने अश्विनच्या हातात चेंडू सोपवला. त्याने सलामीवीर फलंदाज टॉम लॅथमला वैयक्तिक ९ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर अश्विनने डेव्हॉन कॉन्वेला पायचित पकडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेला कॉन्वे या डावात १९ धावा काढू शकला. यानंतर रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांनी संघाला आधार दिला. एकेरी दुहेरी, मध्येच चौकार असा मेळ घालत दोघांनी भारताच्या गोलंदाजीला निष्प्रभ केले. ३१व्या षटकात चेतेश्वर पुजाराने रॉस टेलरला जीवदान दिले. बुमराहने टाकलेल्या चेंडूवर पुजाराने टेलरचा सोपा झेल सोडला. टेलर तेव्हा २७ धावांवर खेळत होता. विल्यमसन आणि टेलरने ३६व्या षटकात आपली अर्धशतकी भागीदारी आणि ३७व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. यानंतर दोघांनी विजयासाठी अपेक्षित असलेल्या धावांचे अंतर कमी करत भारतावर दबाव वाढवला. दरम्यान विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केले. रॉस टेलरने विजयी चौकार खेचत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यमसनने ८ चौकारांसह नाबाद ५२ तर टेलरने ६ चौकारांसह ४७ धावांची मौल्यवान खेळी केली.

भारताचा दुसरा डाव (राखीव दिवस)

पाचव्या दिवसअखेर २ बाद ६४ धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारताने उपाहारापर्यंत विराट कोहली (१३), चेतेश्वर पुजारा (१५) आणि अजिंक्य रहाणेला (१५) गमावले.  हे स्टार खेळाडू स्वस्तात माघारी परतल्यानंतर ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सांभाळला. उपाहारापर्यंत भारताने ५५ षटकात ५ बाद १३० धावा केल्या. उपाहारानंतर पंतसोबत खेळपट्टीवर उभ्या राहिलेल्या रवींद्र जडेजाला नील वॅगनरने तंबूचा रस्ता दाखवला. जडेजाने १६ धावा केल्या. यष्टीपाठी वॉटलिंगने जडेजाचा झेल घेतला. ७०व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात ऋषभ पंत झेलबाद झाला. बोल्टच्या गोलंदाजीवर तो वैयक्तिक ४१ धावांवर माघारी परतला. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार ठोकले. पंतनंतर बोल्टने अश्विनला टेलरकरवी झेलबाद केले. त्याने ७ धावा केल्या. यानंतर मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या शेपटाकडील फलंदाजांना जास्त वळवळू दिले नाही. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टिम साऊदीने ४८ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. बोल्टने ३, जेमीसनने २ तर नील वॅगनरने १ बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक

  • नाणेफेक – न्यूझीलंड (गोलंदाजी)
  • भारत पहिला डाव – सर्वबाद २१७ (विराट कोहली ४४, अजिंक्य रहाणे ४९,  काईल जेमीसन ५/३१)
  • न्यूझीलंड पहिला डाव – सर्वबाद २४९ (डेव्हॉन कॉन्वे ५४, केन विल्यमसन ४९, मोहम्मद शमी ४/७६)
  • भारत दुसरा डाव – सर्वबाद १७० (ऋषभ पंत ४१, टिम साऊदी ४/४८)
  • न्यूझीलंड दुसरा डाव – २ बाद १४०* (केन विल्यमसन ५२*, रॉस टेलर ४७* अश्विन २/१७) (न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी)

 

दोन्ही संघ 

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोमे, काईल जेमीसन, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक).

Live Blog
23:14 (IST)23 Jun 2021
न्यूझीलंडला ऐतिहासिक विजेतेपद

४६व्या षटकात रॉस टेलरने शमीला चौकार खेचत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यमसनने ८ चौकारांसह नाबाद ५२ तर टेलरने ६ चौकारांसह ४७ धावांची मौल्यवान खेळी केली. न्यूझीलंडने बलाढ्य भारताला ८ गड्यांनी पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले.

22:48 (IST)23 Jun 2021
न्यूझीलंड विजयापासून काही पावले दूर

न्यूझीलंडने ४२ षटकात २ बाद ११५ धावा केल्या असून विजयासाठी त्यांना २४ धावांची गरज आहे.

22:26 (IST)23 Jun 2021
न्यूझीलंडचे शतक पूर्ण

३७व्या षटकात विल्यमसन आणि टेलर या जोडीने न्यूझीलंडचे शतक फलकावर लावले.

22:19 (IST)23 Jun 2021
विल्यमसन-टेलरची अर्धशतकी भागीदारी

विल्यमसन आणि टेलरने ३६व्या षटकात आपली अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. न्यूझीलंडला १७ षटकात ४३ धावांची गरज आहे.

21:59 (IST)23 Jun 2021
रॉस टेलरला जीवदान

३१व्या षटकात चेतेश्वर पुजाराने रॉस टेलरला जीवदान दिले. बुमराहने टाकलेल्या चेंडूवर पुजाराने टेलरचा सोपा झेल सोडला. टेलर तेव्हा २७ धावांवर खेळत होता.

21:29 (IST)23 Jun 2021
टेलर आक्रमक

२४व्या षटकात रॉस टेलरने आक्रमक रूप धारण केले. त्याने अश्विनला दोन चौकार खेचत अपेक्षित धावांचे अंतर कमी केले. २४ षटकात न्यूझीलंडच्या २ बाद ६० धावा झाल्या आहेत.

21:02 (IST)23 Jun 2021
डेव्हॉन कॉन्वे माघारी

अश्विनने सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेला पायचित पकडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेला कॉन्वे या डावात १९ धावा काढू शकला. कॉन्वेनंतर रॉस टेलर मैदानात आला आहे. न्यूझीलंडला ३५ षटकात अजून ९५ धावांची आवश्यकता आहे. 

20:39 (IST)23 Jun 2021
न्यूझीलंडला पहिला धक्का

चहापानानंतर विराटने अश्विनच्या हातात चेंडू सोपवला. त्याने सलामीवीर फलंदाज टॉम लॅथमला वैयक्तिक ९ धावांवर माघारी धाडले. लॅथमनंतर विल्यमसन मैदानात आला आहे. 

20:00 (IST)23 Jun 2021
चहापानापर्यंत न्यूझीलंडची सावध सुरुवात

चहापानापर्यंत न्यूझीलंडने सावध सुरुवात केली आहे. त्यांच्या ८ षटकात बिनबाद १९ धावा झाल्या आहेत. लॅथम ५ तर कॉन्वे ९ धावांवर नाबाद आहे. त्यांना विजयासाठी अजून १२० धावांची गरज आहे.

19:21 (IST)23 Jun 2021
न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात

टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली आहे. इशांत शर्माने भारताकडून पहिले षटक टाकले. 

19:14 (IST)23 Jun 2021
विजेतेपदासाठी न्यूझीलंडसमोर १३९ धावांचे लक्ष्य!

भारताचा दुसरा डाव ७३ षटकात १७० धावांवर आटोपला. पंत बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या शेपटाला जास्त वळवळू दिले नाही. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टिम साऊदीने ४८ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. बोल्टने ३, जेमीसनने २ तर नील वॅगनरने १ बळी घेतला.

18:54 (IST)23 Jun 2021
पंतपाठोपाठ अश्विन बाद

पंतनंतर बोल्टने अश्विनला टेलरकरवी झेलबाद केले. त्याने ७ धावा केल्या. भारताचे आठ गडी तंबूत परतले आहेत.

18:49 (IST)23 Jun 2021
ऋषभ पंत बाद

७०व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात ऋषभ पंत झेलबाद झाला. बोल्टच्या गोलंदाजीवर तो वैयक्तिक ४१ धावांवर माघारी परतला. भारताच्या ६९.२ षटकात ७ बाद १५६ धावा झाल्या आहेत.

18:18 (IST)23 Jun 2021
भारताला सहावा धक्का

पंतसोबत खेळपट्टीवर उभ्या राहिलेल्या रवींद्र जडेजाला नील वॅगनरने तंबूचा रस्ता दाखवला. जडेजाने १६ धावा केल्या. यष्टीपाठी वॉटलिंगने जडेजाचा झेल घेतला. पंतची साथ द्यायला अश्विन मैदानात आला आहे. 

17:53 (IST)23 Jun 2021
लंच ब्रेकनंतर भारताकडे १०० धावांची आघाडी

लंच ब्रेकनंतर भारताने आपल्या धावांच्या आघाडीत वाढ केली. आता भारताकडे १०० धावांची आघाडी आहे.

17:05 (IST)23 Jun 2021
लंच ब्रेकपर्यंत भारत

लंच ब्रेकपर्यंत भारताकडे ९८ धावांची आघाडी असून ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा मैदानात आहेत. ५ धावांवर जीवदान मिळालेला पंत ४ चौकारांसह २८ धावांवर नाबाद आहे. 

16:37 (IST)23 Jun 2021
भारताचा अर्धा संघ तंबूत

टीम इंडियाचे शतक फलकावर लावल्यानंतर उपकर्णधार आणि मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे माघारी परतला. ट्रेंट बोल्टने त्याला वैयक्तिक १५ धावांवर माघारी धाडले. रहाणेनंतर रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात आला आहे.

16:29 (IST)23 Jun 2021
टीम इंडियाचे शतक पूर्ण

ऋषभ पंत आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी ४९व्या षटकात टीम इंडियाचे शतक फलकावर लावले. 

15:49 (IST)23 Jun 2021
ऋषभ पंतला जीवदान

४०व्या षटकात जेमीसनच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतला जीवदान मिळाले. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या टिम साऊदीने पंतचा वैयक्तिक ५ धावांवर सोपा झेल सोडला. 

15:38 (IST)23 Jun 2021
जेमीसनचा भारताला दुहेरी हादरा

विराटपाठोपाठ जेमीसनने अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला यष्टीपाठी झेलबाद करत अजून एक हादरा दिला. पुजाराला १५ धावा करता आल्या. आता ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणेची जोडी मैदानात आहे.

15:28 (IST)23 Jun 2021
भारताचा कर्णधार माघारी, उपकर्णधार मैदानात

पहिल्या डावात विराटला बाद केलेल्या काईल जेमीसनने दुसऱ्या डावातही त्याला तंबूचा मार्ग दाखवला. जेमीसनने विराटला यष्टीपाठी झेलबाद केले.  विराटला १३ धावा करता आल्या. विराटनंतर अजिंक्य रहाणे मैदानात आला आहे.

15:04 (IST)23 Jun 2021
सामन्याला सुरुवात

आज सुरुवातीचे म्हणजे ३१वे षटक टाकण्यासाठी न्यूझीलंडने टिम साऊदीच्या हातात चेंडू सोपवला आहे. विराट आणि चेतेश्वर यांनी फलंदाजीला सुरुवात केली आहे. 

Next Stories
1 WTC Final: सामना शेवटच्या दिवसापर्यंत गेल्याचा आनंद पण…; निकालाबद्दल टीम साऊदीचं भाष्य
2 Euro Cup 2020 : क्रोएशियाचा स्कॉटलंडवर ३-१ ने विजय तर इंग्लंडची चेक रिपब्लिकवर मात
3 कसोटीतील रंगत कायम!
Just Now!
X