कॉफी विथ करण या शो मध्ये आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी गुरुवारी उठवण्यात आली. त्यामुळे हार्दिक पांड्याला एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडला पाठवण्यात आले, तर राहुलला भारत अ संघात स्थान देण्यात आले होते. मात्र आता राहुलदेखील न्यूझीलंडला जाणार असून टी२० मालिकेसाठी संघात दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

इंग्लंड लायन्स विरुद्धच्या उरलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी लोकेश राहुल भारतीय अ संघात दाखल होणार असल्याची माहिती ‘बीसीसीआय’ने दिली होती. त्यानुसार तो हे सामने खेळणार आहे. मात्र विराट कोहली याला न्यूझीलंडविरुद्दच्या टी२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे वरच्या फळीत अनुभवी खेळाडूंचा भरणा असावा म्हणून राहुलचा टी२० संघात समावेश करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

BCCI च्या CoA ने ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता. ही बंदी तत्काळ प्रभावाने उठवण्यात आली होती. पण बंदी उठवण्यात आली असली तरी त्यांना चौकशीपासून पळता येणार नसून लोकपाल (होमडसमन) नेमल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.