भारताविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दुखापतीमुळे न खेळू शकलेला न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल याला टी२० मालिकेतून मुकावे लागणार आहे. गप्टिलच्या दुखापतीवर उपचार सुरू असून तो फिजिओच्या निरिक्षणाखाली उपचार घेत आहे. मात्र तो लवकर तंदुरुस्त होऊ शकत नसल्याने त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. गप्टिलच्या जागी न्यूझीलंडच्या संघात जिमी निशम या स्फोटक फलंदाजाला स्थान देण्यात आले आहे.

भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात जिमी निशम याने दणकेबाज खेळी केली होती. त्याने ३२ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याने या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार लगावले होते. मात्र साथीदार फलंदाजबरोबर गैरसमज झाल्यामुळे तो धावबाद झाला. पण टी२० सामन्यांमध्ये त्याचा हा फॉर्म सुरु राहिल्यास भारतासाठी तो डोकेदुखी ठरू शकतो.

दरम्यान, शनिवारी सरावादरम्यान गप्टिलच्या कमरेला जखम झाली होती. त्यानंतर फिजियो विजय वल्लभ आणि सिक्योरिटी मॅनेजर टेरी मिनिश यांच्या मदतीने गप्टिलने मैदान सोडले. त्यामुळे अखेरच्या सामन्यात गप्टिलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अखेर त्याला आता टी२० मालिकेतूनही माघार घ्यावी लागली आहे.