न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली. नेपियर एकदिवसीय सामन्यात भारताने सुमारे १५ षटके आणि ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला अवघ्या १५७ धावांत गुंडाळले. १५८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव एकूण २ वेळा थांबवण्यात आला. पहिल्यांदा उपहाराच्या विश्रांतीमुळे खेळ थांबवण्यात आला होता. नियोजित वेळेआधी न्यूझीलंडचा डाव संपला. त्यामुळे भारताला लगेच फलंदाजीसाठी यावे लागले आणि त्यानंतर उपहाराची विश्रांती घेण्यात आली. दुसऱ्या वेळी मात्र हा सामना अति सूर्यप्रकाशामुळे थांबवण्यात आला होता. मात्र याबाबत नेपियरचे मेयर बिल डाल्टन यांनी खेळाडूंना एक सल्ला दिला आहे.

भारताची फलंदाजी सुरु असताना हा प्रकार घडला. फलंदाजी करताना सूर्यकिरणे थेट डोळ्यावर येत असल्याने खेळ थांबवण्यात आला होता. शिखर धवन फलंदाजी करत असताना त्याने चेंडू दिसत नसल्याची पंचांकडे तक्रार केली. त्यानंतर पंचांनी याबाबत चर्चा करून सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. अपुऱ्या प्रकाशामुळे अनेकदा खेळ थांबवावा लागतो, पण आज अति प्रकाशामुळे खेळ थांबला.

याबाबत नेपियरचे मेयर डाल्टन खेळाडूंना म्हणाले की खेळाडूंनी थोडेसे कणखर व्हायला हवे. सूर्यप्रकाश अधिक आहे म्हणून सामना थांबवण्यात येणे हे कितपत बरोबर आहे याबाबत मी बोलणार नाही. पण अशीच गोष्ट जर भारतात घडली असती, तर तो सामना थांबवण्यात आला असता का? असा सवाल त्यांनी केला.

हे क्रिकेटपटू खेळाडू म्हणून मैदानात वावरत असतात. त्यांचा खेळ हा मैदानी खेळ आहे. त्यामुळे डोळ्यावर थोडीशी सूर्यकिरणे आली, म्हणून खेळ थांबवणे हे मला तरी पटलेले नाही. खेळाडूंनी या संदर्भात थोडेसे कणखर व्हायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.