न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात भारताला ८० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या गोलंदाजीपुढे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने दिलेले २२० धावांचे आव्हान पार करताना भारताचा डाव कोलमडला. भारतीय संघ केवळ १३९ धावांपर्यंत मजल मारु शकला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करत भारताला २२० धावांचे आव्हान दिले. सलामीवीर कॉलिन मुनरो आणि सिफर्ट यांनी ८६ धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर अखेर भारताला पहिला बळी मिळाला.

पहिल्या टी २० सामन्यात या दोघांनी ८६ धावांची भागीदारी केली, पण त्या आधीच एकदा स्टंपवरील बेल्स पडली असूनही न्यूझीलंडच्या फलंदाजाला बाद देण्यात आले नाही. कॉलिन मुनरो फलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बेल्स पडली. पण ही घटना चेंडू टाकण्याच्या आधीच घडली. वाऱ्याने बेल्स पडली आणि स्टंपचा LED लाईट पेटला. हे पाहून क्षणभर मुनरोही थबकला आणि पॅव्हेलियनकडे चालायला लागला. पण तितक्याच वाऱ्याने ती बेल्स पडल्याचे त्याच्या लक्षात आले आणि तो थांबला.

दरम्यान, या नंतर न्यूझीलंडने भारताला २२० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या या सारख्या फलंदाजांनी पूर्णपणे गुडघे टेकले. शिखर धवन, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयन्त तोकडे पडले.