पहिल्या ३ एकदिवसीय सामन्यात हार पत्करावी लागल्यानंतर अखेर न्यूझीलंडच्या संघाला विजयी सूर गवसला. न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात ८ गडी आणि २१२ चेंडू राखून टीम इंडियाचा पराभव केला. प्रतिस्पर्धी संघाने चेंडू राखून विजय मिळवण्याच्या तुलनेत हा भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. न्यूझीलंडला भारताने अवघ्या ९२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांनी केवळ १४.४ षटकात पूर्ण केले आणि २१२ चेंडू राखून सामना जिंकला.

या आधी भारतावर अशा पद्धतीची नामुष्की ओढवली होती. श्रीलंकेने भारताला २०९ चेंडू आणि ८ गडी राखून पराभूत केले होते. २२ ऑगस्ट २०१० ला भारताला हा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. त्या सामन्यात भारताचा डाव १०४ धावात आटोपला होता. मात्र त्यापेक्षा आज झालेला पराभव अधिक मोठा आणि मानहानीकारक ठरला.

दरम्यान, चौथ्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवात खराब झाली होती. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी झटपट माघारी परतली. कारकिर्दीतील २००वा सामना खेळणाऱ्या रोहित शर्माला अवघ्या ७ धावा करता आल्या. विराट कोहलीच्या जागेवर संघात स्थान मिळालेला शुभमन गिलही आपला प्रभाव पाडू शकला नाही. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज बोल्ट आणि डी-ग्रँडहोमच्या जाळ्यात अडकत गेले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने १० षटकात २१ धावांत ५ तर कॉलिन डी-ग्रँडहोमने १० षटकात २६ धावांमध्ये ३ बळी घेतले. तर टॉड अस्टल आणि जिमी निशम यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. भारताकडून युझवेन्द्र चहल याने सर्वाधिक १८ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला.