टीम इंडियाने बुधवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला ८ गडी राखून सहज पराभूत केले. हा भारताचा तब्बल १० वर्षानंतर न्यूझीलंडच्या भूमीतील विजय ठरला. या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव अवघ्या १५७ धावांत आटोपला. तसेच या आव्हानाचा बचाव करताना त्यांना भारताचे केवळ २ गडी बाद करता आले. या कामगिरीबाबत निराशा व्यक्त करत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने संघ चांगला खेळला नसल्याची कबुली दिली.

‘पहिल्या एकदिवसीय सामन्यात आम्ही चांगला खेळ करू शकलो नाही. आम्ही काही छोट्या चुका केल्या. पण आता पुढील सामन्यात त्या सर्व चुका सुधारणे आवश्यक आहे. तसे केल्यास आम्ही सांघिक कामगिरीच्या जोरावर कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो, असे विल्यमसन म्हणाला.

ज्या खेळपट्टीवर आम्ही खेळलो ती खेळपट्टी खराब नव्हती, पण आमच्या अपेक्षेपेक्षा ती वेगळी होती. आम्ही त्या खेळपट्टीवर थोडे चतुराईने खेळायला हवे होते. भारताच्या संघाने या खेळपट्टीवर आम्हाला उघडे पाडले आणि प्रत्येक धावेसाठी आमहाला खूप परिश्रम करायला लावले. त्यांच्या गोलंदाजांनी ज्या टप्प्यावर गोलंदाजी केली, त्यामुळे आम्हाला धावा करता आल्या नाहीत, असे त्याने कबुल केले.

दरम्यान, न्यूझीलंडने दिलेले १५८ धावांचे आव्हान भारताने ३५ षटकांच्या आत पूर्ण केले.