भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानच्या टी-२० मालिकेमधील सलग दुसऱ्या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने लागला. तिसऱ्या सामन्याप्रमाणेच शुक्रवारी झालेला चौथा सामनाही भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. अतिशय रोमहर्षक ठरलेल्या सुपर ओव्हरमध्ये भारताने न्युझीलंडचा पराभव करत चौथ्या टी -२० सामन्यात विजय मिळवला आहे. सुपर ओव्हरमध्ये पराभव होण्याची न्यूझीलंडची ही पहिलीच वेळ नव्हती. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला आतापर्यंत फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.

२००८ ते २०२० या दरम्यान न्यूझीलंड संघाला सात वेळा सुपर ओव्हरचे सामने खेळावे लागले आहेत. यापैकी २०१० साली झालेला ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील सामन्याचा अपवाद वगळता सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा कायम पराभवच झाला आहे. सात पैकी सहा सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज (२००८ आणि २०१२), श्रीलंका (२०१२), इंग्लंड (२०१९) आणि भारताविरोधात खेळलेले दोन सामने न्यूझीलंडने गामावले आहेत.

टी-२० क्रिकेट इतिहासात आतापर्यंत १४ सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला आहे. यात सर्वाधिक सामने खेळण्याचा मान न्यूझीलंडने पटकावला आहे. मात्र त्याच वेळी सर्वाधिक सामने देखील त्यांनीच गामावले. तर दुसरीकडे भारताने न्यूझीलंडविरुद्ध झालेला सलग दुसरा टी-२० सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला आहे. हा सामना जिंकून विराट सेनेने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ४-० ची अभेद्य आघाडी मिळवली आहे.