यजमान न्यूझीलंडने गुरुवारी भारताला सेडन पार्क येथे झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात ८ गडी राखून पराभूत केले. यजमानांना सलग ३ सामन्यात धूळ चारून मालिकेत विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला चौथ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडकडून अपमानास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. भारताचा डाव अवघ्या ९२ धावांवर आटोपला आणि अवघ्या १५ षटकात न्यूझीलंडने सामना खिशात घातला.

या सामन्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आल्यामुळे रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले. रोहित शर्माचा हा २००वा एकदिवसीय सामना होता. आजच्या सामन्यात पराभूत झाल्याने विराट आणि रोहित यांच्या बाबतीत एक विचित्र योगायोग घडून आला. दोन्ही खेळाडू आपल्या वैयक्तिक २०० व्या एकदिवसीय सामन्यात भारताचे न्यूझीलंडविरुद्धच नेतृत्व करत होते आणि दुर्दैव म्हणजे दोघांनाही २०० व्या एकदिवसीय सामन्यात पराभूत व्हावे लागले.

दरम्यान, चौथ्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवात खराब झाली होती. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी झटपट माघारी परतली. कारकिर्दीतील २००वा सामना खेळणाऱ्या रोहित शर्माला अवघ्या ७ धावा करता आल्या. विराट कोहलीच्या जागेवर संघात स्थान मिळालेला शुभमन गिलही आपला प्रभाव पाडू शकला नाही. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज बोल्ट आणि डी-ग्रँडहोमच्या जाळ्यात अडकत गेले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने १० षटकात २१ धावांत ५ तर कॉलिन डी-ग्रँडहोमने १० षटकात २६ धावांमध्ये ३ बळी घेतले. तर टॉड अस्टल आणि जिमी निशम यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. भारताकडून युझवेन्द्र चहल याने सर्वाधिक १८ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. न्यूझीलंडने हा सामना केवळ १५ षटकात जिंकला.