भारताच्या पुरुष संघाने न्यूझीलंडच्या संघावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर आज भारताच्या महिला संघानेही न्यूझीलंड महिला संघाचा पराभव केला. मराठमोळ्या स्मृती मंधानाने झळकावलेलं शतक आणि गोलंदाजीत एकता बिश्त-पुनम यादवच्या भेदक माऱ्याच्या जोऱ्यावर भारतीय महिलांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिलांनी १-० ने आघाडी घेतली.

या सामन्यात मराठमोळ्या स्मृती मंधानाने १२० चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या. तिच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला. स्मृतीचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील चौथे शतक होते. स्मृतीने या शतकाबरोबार ‘SENA’ देशांमध्ये म्हणजेत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चार देशात एकदिवसीय शतक करण्याचा पराक्रम केला. आतापर्यंत भारताच्या एकाही महिला खेळाडूला ‘SENA’ देशांमध्ये शतक करता आले नाही. आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंमध्ये अशी कामगिरी करणारी स्मृती दुसरी खेळाडू ठरली. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या क्लेरा टेलरच्या नावावर होता.

दरम्यान, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय महिलांनी न्यूझीलंडचा डाव १९२ धावांत गुंडाळला. एकता बिश्त आणि पुनम यादव यांनी भेदक मारा करुन न्यूझीलंडच्या संघाला खिंडार पाडले. न्यूझीलंडकडून सलामीवीर सुझी बेट्सने सर्वाधिक ३६ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांची तिला साथ मिळू शकली नाही. एकता आणि पूनमने ३-३, दिप्ती शर्माने २ तर शिखा पांडेने १ बळी टिपला.

या आव्हानचा पाठलाग करताना भारतीय महिलांच्या डावाची सुरुवात आक्रमक झाली. मुंबईकर जेमायमा रॉड्रीग्ज आणि सांगलीच्या स्मृती मंधानाने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. दोघींनी १९० धावांची सलामी दिली. विजयासाठी ३ धावा हव्या असताना मंधाना माघारी परतली. मग रॉड्रीग्ज आणि दिप्ती शर्मा यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.