टीम इंडियाने न्यूझीलंडच्या संघावर सोमवारी सलग तिसरा विजय मिळवल. गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला नमवले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. तब्बल १० वर्षानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली. या बरोबरच कर्णधार विराट कोहलीने एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.

विराट-रोहित जोडीची ११३ धावांची भागीदारी

 

विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील पहिले ३ सामने जिंकले. अशी किमया या आधी पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिकच्या या नेतृत्वात पाकिस्तानच्या संघाने केली होती. पाकिस्तानच्या सलीम मलिकने १९९४ च्या दौऱ्यात सलग तीन एकदिवसीय सामने जिंकले होते. त्यानंतर कोणत्याही आशियाई कर्णधाराला हे शक्य झाले नव्हते. पण विराटने २५ वर्षानंतर हा पराक्रम केला. न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत सलग तीन एकदिवसीय सामन्यात पराभूत करणारा विराट दुसरा आशियाई कर्णधार ठरला.

Video : जेव्हा हार्दिक पांड्या शिखर धवनवर भडकतो…

दरम्यान, सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेले २४४ धावांचे आव्हान भारताने सहज पूर्ण केले. विराट आणि रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. रोहितने ६२ तर कोहलीने ६० धावा केल्या. या नंतर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक या जोडीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.