न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना बे ओव्हल मैदानावर सोमवारी भारताने जिंकला. २४३ धावांचे माफक आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडमध्ये प्रथमच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय मालिका जिंकली. या विजयामुळे विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील विजयाची सर्वाधिक टक्केवारी असणाऱ्या कर्णधारांमध्ये रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे.
विराटने आतापर्यंत ६३ एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. त्यात त्याने ४७ सामन्यात भारताला विजय मिळवून दिला असून त्याची कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी ७४.६० अशी झाली आहे. रिकी पॉन्टिंग याने कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाचे २३० सामन्यात नेतृत्व केले होते. त्यापैकी १६५ सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे त्याच्या विजयाची टक्केवारी ७१.७४ इतकी होती. त्याला कोहलीने मागे टाकले आहे.
या यादीत कोहली सध्या दुसऱ्या स्थानी आहे. विंडीजचे महान क्रिकेटपटू क्लाईव्ह लॉइड यांनी ८४ एकदिवसीय सामन्यात संघाचे नेतृत्व केले असून त्यातील ६४ सामन्यात संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे त्यांची विजयाची टक्केवारी ७६.१९ एवढी असून ते अव्वल क्रमांकावर आहेत. तर पॉन्टिंग आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिए यांची विजयाची टक्केवारी सारखीच आहे. क्रोनिए कर्णधार असताना दक्षिण आफ्रिकेने १३८ पैकी ९९ सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे त्याच्या विजयाची टक्केवारीही ७१.७४ होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 4:32 pm