न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात भारताच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. पण भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी लढाऊ वृत्ती दाखवत सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. पण संथ खेळी करण्याच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यात त्याला सतत लक्ष्य करण्यात येत आहे. यावर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना चांगलेच सुनावले आहे.

धोनी हा दिग्गज खेळाडू आहे. त्याच्यासारख्या महान खेळाडूवर टीका करण्याएवढा कोणीही मोठा नाही. त्याला नावं ठेवणाऱ्यांना क्रिकेट तरी कळतं का? असा प्रश्न भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विचारला आहे. गेल्या वर्षभरात धोनीचा फॉर्म चांगला आहे. तो संघाला अजूनही विजयी शेवट करून देण्यास समर्थ आहे. अडलेडमध्ये आपल्याला त्याचा प्रत्यय आला. तो २००८ किंवा २०११ मधील धोनी नाही हे खरे आहे. पण त्याचा अनुभव ही संघासाठी मोठी गोष्ट आहे. कारण अनुभव हा बाजारात विकत मिळत नाही, असे शास्त्री म्हणाले.

धोनी ३०-४० वर्षांतून एकदाच होणारा असा खेळाडू आहे. धोनी हा सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि सुनील गावसकर या महान खेळाडूंप्रमाणे आहे. तो खेळासाठी भूषण आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिला क्रमांक मिळविण्याऱ्या संघाचे नेतृत्व त्याने केले आहे. दोन विश्वचषक धोनीच्या नावावर आहेत. त्यामुळे त्याला बोलण्यापूर्वी लोकांनी क्रिकेटचा थोडा अभ्यास करायला हवा, असे मत शास्त्री यांनी व्यक्त केले.