न्यूझीलंड विरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली. पहिल्या ३ सामन्यात एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने चौथ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव अवघ्या ९२ धावांवर आटोपला आणि केवळ १५ षटकात न्यूझीलंडने हे आव्हान पार केले. या बरोबरच भारतीय संघाने न्यूझीलंडमधील आपलाच नीचांकी धावसंख्येचा विक्रम मोडला. तसेच, भारताला न्यूझीलंडच्या भूमीवर पहिल्यांदाच शंभरी गाठता आली नाही.

भारतीय संघाची अवस्था ३५ धावांत ६ बळी अशी होती. त्यावेळी भारतीय संघ पन्नाशी गाठेल की नाही, अशी शंका क्रिकेटप्रेमींच्या मनात उपस्थित झाली. पण तळाच्या फलंदाजांनी झुंज दिली आणि कशीबशी ९२ धावांपर्यंत मजल मारली. पण तरीदेखील ही भारताची न्यूझीलंडमधील सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. या आधी न्यूझीलंडमध्ये भारताची नीचांकी धावसंख्या १०८ होती. २००३ मध्ये ख्राईस्टचर्च येथे झालेल्या सामन्यात सौरव गांगुली याच्या नेतृत्वाखाली भारताने हा सामना खेळला होता.

न्यूझीलंडची भारतावर 8 गडी राखून मात, ट्रेंट बोल्ट चमकला

दरम्यान, चौथ्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवातच खराब झाली होती. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी झटपट माघारी परतली. कारकिर्दीतील २००वा सामना खेळणाऱ्या रोहित शर्माला अवघ्या ७ धावा करता आल्या. विराट कोहलीच्या जागेवर संघात स्थान मिळालेला शुभमन गिलही आपला प्रभाव पाडू शकला नाही. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज बोल्ट आणि डी-ग्रँडहोमच्या जाळ्यात अडकत गेले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने १० षटकात २१ धावांत ५ तर कॉलिन डी-ग्रँडहोमने १० षटकात २६ धावांमध्ये ३ बळी घेतले. तर टॉड अस्टल आणि जिमी निशम यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. भारताकडून युझवेन्द्र चहल याने सर्वाधिक १८ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला.