भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने सहज जिंकला. दुसरा सामना शनिवारी (२६ जानेवारी) बे ओव्हल, माउंट माऊंगानुई येथे सुरु आहे. मालिकेतील तिसरा सामनादेखील याच मैदानावर खेळवण्यात येणार आहे. माउंट माऊंगानुई येथील वातावरण हे अतिशय प्रसन्न असल्याने शुक्रवारी भारतीय संघातील काही खेळाडूंनी तेथे फिरण्याचा आनंद लुटला. पण मूळ लक्ष वेधून घेतले ते तेथील पारंपरिक स्वागताने…

भारतीय संघ शुक्रवारी जेव्हा माउंट माऊंगानुई येथे पोहोचला, त्यावेळी तेथील माओरी समाजाच्या स्थानिक कलाकारांनी पारंपरिक पद्धतीने भारतीय चमूचे स्वागत केले. यावेळी त्या कलाकारांनी काही नृत्याविष्कार करून दाखवले. मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या छोटेखानी कार्यक्रमानंतर माओरी समाजाच्या प्रतिनिधींनी भारतीय खेळाडू व सपोर्ट स्टाफचे त्यांच्या पद्धतीने कपाळाला कपाळ लावून स्वागत केले. BCCI ने हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

दरम्यान, प्रखर सुर्यप्रकाशामुळे पहिला सामना थांबवण्यात आला होता. त्यामुळे सामन्यातील एक षटक कमी करुन भारताला विजयासाठी दिलेल्या आव्हानात एक धाव कमी करण्यात आली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीलाच रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर धवन आणि कोहली यांनी सामना जिंकवण्यात मोलाची भूमिका बजावली. शिखर धवनने ७५ धावा केल्या. विराट कोहलीनेही त्याला उत्तम साथ दिली. त्याआधी मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि अन्य भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडला १५७ धावांवर रोखले. विल्यमसनने ८१ चेंडूत ७ चौकारांसह ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज आपल्या कर्णधाराला साथ देऊ शकला नाही. भारताकडून कुलदीप यादवने ४ तर मोहम्मद शमीने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. या दोघांना युझवेंद्र चहलने २ तर केदार जाधवने १ विकेट घेत चांगली साथ दिली.