भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना ७ गडी राखून जिंकला आणि मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी केलेल्या १३३ धावांच्या जोरदार भागीदारीच्या बळावर भारताने सामना जिंकला. पण न्यूझीलंडची फलंदाजी सुरु असतानाही कोहली चांगलाच चर्चेत राहिला.

४८ व्या षटकात मोहम्मद शमीने फलंदाज ईश सोढीला चेंडू टाकला. हा चेंडू त्याने हवेत उंच टोलवला. कोहली चेंडूच्या रेषेत खाली झेल टिपण्यासाठी उभा राहिला पण अत्यंत सहज झेल त्याच्याकडून सुटला. कोहलीसारख्या उत्तम फिल्डरकडून झेल सुटला हे पाहून चाहत्यांनाही विश्वास बसला नाही. झेल अत्यंत सोपा दिसत होता. झेल सुटला तेव्हा न्यूझीलंडची अवस्था बिकट होती, त्यामुळे त्याबाबत जास्त चर्चा झाली नाही.

हा झेल सोडल्यानंतर कोहलीने हात दाखवत गोलंदाजाची माफी मागितली आणि फिल्डिंगला निघून गेला. त्यानंतर मात्र विराटने लगेचच आपल्या चुकीची भरपाई केली. त्याच षटकात सोढीने पुन्हा विराटकडे चेंडू टोलवला. यावेळी त्याने कोणतीही चूक न करता त्याचा झेल टिपला.

इतकेच नव्हे तर पुढच्याच षटकात चपळाई दाखवत एका गड्याला धावबाददेखील केले. दुसऱ्या सामन्यात तडाखेबाज अर्धशतकी खेळी करणाऱ्या डग ब्रेसवेलला त्याने माघारी धाडले.

कोहलीने झेल सोडला तेव्हा अनेकांनी त्याला ट्रोल केले. पण नंतर त्याने दोन गडी बाद करण्यात मोलाची कामगिरी बजावल्यामुळे चाहत्यांनी त्याची स्तुतीदेखील केली.