भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कायमच रोमांचक असतो. या दोन देशांतील क्रिकेटपटूंची अनेकदा तुलना केली जाते. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा युवा खेळाडू बाबर आझम या दोघांच्या खेळाची आणि फलंदाजीची बहुतांश वेळा तुलना करण्यात आली आहे. नुकतेच माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू टॉम मुडी यांनीही या दोघांची तुलना केली आहे. जर तुम्हाला विराट कोहली उत्तम फलंदाज वाटत असेल, तर तुम्ही बाबर आझमची फलंदाजी नक्की बघा, असं मत त्यांनी द पिच साईड एक्स्पर्ट्स या पॉडकास्ट कार्यक्रमात मांडलं आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत कार्यक्रमात वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू इयन बिशप आणि क्रिकेट जाणकार फ्रेडी विल्ड हेदेखील होते.

जाडेजाची खिल्ली उडवणाऱ्या जॉन्टी ऱ्होड्सला फॅनने केलं होतं गप्प

या कार्यक्रमात टॉम मुडी यांनी बाबर आझमच्या चांगल्या कामगिरीचा उल्लेख केला. “गेल्या वर्षभरात बाबर आझमने अशी दमदार कामगिरी केली आहे की त्यातून तो नक्कीच खास स्थानावर पोहोचू शकेल. आपण नेहमी फलंदाजीत विराट कोहली कशाप्रकारे सर्वोत्तम आहे याची चर्चा करतो. जर तुम्हाला विराट कोहलीची फलंदाजी पाहायला आवडते, तर तुम्ही बाबर आझमची फलंदाजी नक्की पाहा. बाबर आझमने जरी केवळ २६ सामनेच खेळले असतील, तरी त्यापैकी अर्ध्या सामन्यांमध्ये तो मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसला. त्याला पाकिस्तानच्या संघाने मुख्य फलंदाजांपैकी एक मानलं नव्हतं. तो खरंच प्रतिभावंत फलंदाज आहे. पुढच्या पाच ते दहा वर्षात बाबर आझम नक्कीच दशकातील पहिल्या पाच सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत असेल”, असं मुडी यांनी स्पष्टपणे सांगितलं.

सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याची आकडेवारी पाहून तरी त्याला मधल्या फळीत स्थान देणं चुकीचं आहे. (फलंदाजीच्या क्रमवारीत त्याला बढती दिली जायला हवी.) विदेशी खेळपट्ट्यांवर त्याची धावांची सरासरी ३७ आहे, तर मायदेशातील सामन्यांत तो ६७ च्या सरासरीने खेळतो. यातही एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की तो विदेशात अगदी मोजकेच सामने खेळला आहे आणि ते सामने देखील त्याच्या कारकिर्दीच्या सुरूवातीला खेळण्यात आले होते”, असे सांगत मुडी यांनी बाबर आझमची काहीशी पाठराखणही केली.