भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. कोणत्याही खेळात या दोन देशांमध्ये लढत असल्यास ती लढत रंगतदार होणार हे नक्की असते. तशातच ती लढत क्रिकेटच्या मैदानावर असेल, तर मग दोन्ही देशाचे चाहते टीव्हीला चिकटून बसतात. पण गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव खूपच वाढला असल्यामुळे या दोन संघात मोजके क्रिकेट सामने झाले आहेत. या पुढे देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने खेळले जातील की नाही याबाबत बऱ्याच चर्चा रंगताना दिसतात. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) च्या प्रशासकीय समिती (COA) चे अध्यक्ष विनोद राय यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

विनोद राय

पत्रकारांशी बोलताना राय म्हणाले की भारत आणि पाक यांच्यातील क्रिकेट संबंध केंद्र सरकारने ठरवलेल्या नियमानुसारच होतील. भारत सरकारने भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांबद्दल काही गोष्टी ठरवल्या आहेत. भारत-पाक सामने हे भारतात किंवा पाकिस्तानच्या भूमीत होणार नाहीत. पण तटस्थ ठिकाणी मात्र या दोन संघांमध्ये सामने खेळले जाऊ शकतात.

इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक २०१९ च्या आधी पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानशी खेळू नका, असा सूर उमटला होता. या प्रकरणी राय यांनी आपले मत व्यक्त केले. “१६ जूनला भारत पाक आमनेसामने असणार होते. त्याआधीदेखील भारताने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळू नये असे म्हटले जात होते. भारतीयांचे तसे मत होते आणि प्रसारमाध्यमांनीदेखील ते दाखवले. आपण जर पाकिस्तानविरूद्ध तो सामना खेळला नसता, तर आपण केवळ २ गुण गमावले असते. पण असा विचार करा की पाकिस्तान आपल्याविरूद्ध उपांत्य फेरीत खेळण्यासाठी समोर उभा ठाकला असता आणि तेव्हा जर आपण माघार घेतली असती, तर आपण आपल्याच पायावर गोळी झाडून घेण्यासारखे झाले असते. त्यामुळे आपण माघार घेण्याऐवजी त्यांना धूळ चारू असा विचार आम्ही साऱ्यांनी केला”, असे स्पष्टीकरण राय यांनी दिले.