टी २० विश्वचषकाच्या पहिल्याच वर्षी भारतीय संघाने कोणाच्या ध्यानीमनी नसताना विजेतेपद मिळवलं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिली टी२० चॅम्पियन झाली. या विजेतेपदासाठी भारताला फायनलमध्ये पाकिस्तानशी झुंजावं लागलं होतं. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने भारतीय फलंदाजांच्या चांगलेच नाकीनऊ आणले होते. या गोलंदाजाने आज (१७ ऑक्टो) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. तो गोलंदाज म्हणजे उमर गुल.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज उमर गुल याने आंतरराष्ट्रीयच नव्हे तर सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांना रामराम ठोकला. सध्या पाकिस्तानात सुरू असलेल्या नॅशनल टी२० कपमध्ये उमर गुलचा संघ बलुचिस्तान हा उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. त्यानंतर गुलने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. उमर गुलने २००७च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय फलंदाजांना हैराण केलं होतं. ४ षटकांत त्याने २८ धावा देत त्याने गौतम गंभीर, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी हे ३ महत्त्वाचे बळी टिपले होते.

एप्रिल २००३ साली उमर गुलने झिम्बाव्बेविरूद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर तब्बल १७ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीनंतर त्याने निवृत्ती जाहीर केली.