२००३ च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सामना जिंकत विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते. पण हा विश्वचषक लक्षात राहिला तो सचिनने शोएब अख्तरला लागवलेल्या षटकारामुळे… त्या सामन्यात पाकिस्तानाने भारताला २७४ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान तसे पाहता तगडे होते, पण भारताने सचिनच्या दमदार खेळीच्या जोरावर हे आव्हान ४ षटके राखून पूर्ण केले होते. या सामन्यांबाबत एक मोठा खुलासा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने केला आहे.

“सेंच्युरियनच्या मैदानावर भारताविरुद्ध झालेला २००३ विश्वचषकातील सामना हा माझ्यासाठी संपूर्ण कारकिर्दीतील सर्वात दुःखदायक सामना होता. वेगवान आणि भेदक मारा करू शकणाऱ्या गोलंदाजांचा ताफा असूनही आम्ही २७४ धावा वाचवू शकलो नाही. मी तंदुरुस्त नव्हतो. सामन्याच्या पूर्वसंध्येला मला त्या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी ४ ते ५ इंजेक्शन घ्यावी लागली. पण त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून आला. त्या इंजेक्शनमुळे माझ्या डाव्या गुडघ्यात पाणी भरले आणि माझा गुडघा बधिर झाला. गोलंदाजी करताना माझा गुडघा बधिर झाल्याचे मला जाणवू लागले होते. मला गोलंदाजी करताना रन-अप घेण्यासही त्रास होत होता. त्यामुळे सलामीवीर सचिन आणि सेहवाग यांनी आम्हाला चोप दिला आणि आम्हाला सामना गमवावा लागला”, असा खुलासा शोएब अख्तरने केला.

“पहिला डाव संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये सगळे असतानाच मी म्हटले होते की आपल्या ३०-४० धावा कमी झाल्या. त्यावर मला पाकिस्तानी सहकारी म्हणाले होते की २७३ जर पुरेशी धावसंख्या नसेल, तर किती धावसंख्या हवी? पण मला माहिती होते की ती खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती त्यामुळे त्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज देखील चांगली कामगिरी करू शकतात, याचा मला अंदाज होता”, असेही तो म्हणाला.

“मी तंदुरुस्त नसल्याने मला सुरुवातीला चांगली गोलंदाजी करता आली नाही. कर्णधार वकार युनिसचे मला गोलंदाजीपासून दूर केले आणि खूप उशिरा पुन्हा गोलंदाजी दिली. मी सचिनला ९८ धावांवर बाद केले. सुरुवातीपासूनच मी तशी गोलंदाजी करायला हवी होती, पण तसे घडले नाही आणि आम्ही हरलो”, असेही अख्तरने स्पष्ट केले.