भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट सामने खेळवले जात नाहीयेत. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतावादी हल्ल्याचं कारण देत भारताने पाकसोबत खेळण्यास नकार दिला आहे. आयसीसीच्या स्पर्धा वगळता भारत-पाक क्रिकेटच्या मैदानात समोरासमोर येत नाहीत. माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी, रमीझ राजा, वकार युनूस यांनीही या प्रस्तावाला आपला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता भारत-पाक क्रिकेटची जगाला गरज आहे, असे मत माजी पाक कर्णधार आणि सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने व्यक्त केले आहे.

“भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. ज्याप्रमाणे दरवर्षी Ashes मालिका रंगते आणि चाहत्यांच्या पसंतीस उतरते. त्याचप्रमाणे भारच-पाक क्रिकेट सामन्यांचीही जगाला गरज आहे असं मला वाटतं. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा संघ Ashes मालिकेशिवाय कसोटी क्रिकेटची कल्पना करू शकतो का? दोन्ही मालिका या त्वेषाने खेळल्या जातात आणि त्याला क्रिकेट जगतात खूप महत्त्व आहे. कारण त्याला इतिहास आहे. मग अशा परिस्थितीत भारत-पाक सामने होत नसतील तर ही लज्जास्पद गोष्ट आहे”, असे शोएब मलिकने एका मुलाखतीत सांगितले.

“माझे अनेक पाकिस्तानी मित्र आहेत जे भारतीय क्रिकेटपटूंबद्दल आदराने बोलतात. त्यांच्या चांगल्या खेळींचे कौतुक करतात. मी आणि माझे पाकिस्तान संघातील सहकारी जेव्हा भारतात जातो तेव्हा आम्हाला तेथील लोकांकडून कायम प्रेम आणि आदर मिळतो. त्यामुळे मला असं वाटतं की आता लवकरात लवकर भारत-पाक क्रिकेट सामने सुरू करायला हवेत”, असे मत त्याने व्यक्त केले.