विश्वचषक स्पर्धा २०११ च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करून विश्वचषक उंचावला. १९८३ नंतर तब्बल २८ वर्षांनी भारताने एकदिवसीय विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्याआधी आजच्या दिवशी म्हणजेच ३० मार्च २०११ ला भारताने पाकवर सेमीफायनलमध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली होती. पाकिस्तानविरुद्ध उपांत्य सामन्यात भारताने २९ धावांनी विजय मिळवला होता, तर सामन्यात चार वेळा जीवदान मिळालेला सचिन तेंडुलकर सामनावीर ठरला होता.

ज्वाला गुट्टाला आली बॉयफ्रेंडची आठवण; त्याने दिला झकास रिप्लाय

असा रंगला होता सामना

भारताने सामन्यात प्रथम फलंदाजी करत २६० धावा केल्या होत्या. त्यात सचिनच्या ८५ धावा होत्या. पाकिस्तानच्या खराब क्षेत्ररक्षणाची सचिनला साथ मिळाली होती. तब्बल चार वेळा त्याचा झेल सुटला होता. मिस्बाह-उल-हक, युनिस खान, उमर गुल आणि कामरान अकमल अशा खेळाडूंकडून सचिनला जीवदान मिळाले होते. त्या सामन्यात सचिनला १०० वे आंतरराष्ट्रीय शतक नोंदविण्याची संधी होती, मात्र सचिन ८५ धावांवर बाद झाला. सईद अजमलच्या गोलंदाजीवर तो आफ्रिदीकडे झेल देऊन माघारी परतला. सचिनला सेहवाग (३८), गंभीर (२७), धोनी (२५) आणि रैना (नाबाद ३६) यांनी चांगली साथ दिली होती. त्यामुळे भारताला २६० धावांपर्यंत मजल मारता आली होती.

IPL : मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज… ‘या’ ५ खेळाडूंनी दोनही संघाकडून मिळवलं विजेतेपद

२६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव मात्र २३१ धावांतच आटोपला होता. पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह उल हक याने ५६ धावांची सर्वाधिक केली होती. वरच्या फळीतील मोहम्मद हाफीज (४३) आणि असद शफीक (३०) यांनीही चांगली झुंज दिली होती. तसेच उमर अकमलनेही (२९) फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताच्या गोलंदाजांपुढे पाकिस्तानचे प्रयत्न तोकडे पडले आणि भारताने २९ धावांनी सामना जिंकला.