विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने उभारलेल्या धावांच्या डोंगराला उत्तर देताना आफ्रिकेनेही चांगला खेळ केला. डीन एल्गर आणि क्विंटन डी-कॉक यांनी झळकावलेल्या शतकाच्या जोरावर आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाअखेरीस ८ गडी गमावत ३५८ धावांपर्यंत मजल मारली. रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा यांच्या फिरकीच्या जाळ्यात आफ्रिकन फलंदाज अडकले. डावखुरा फिरकीपटू रविंद्र जाडेजाने यादरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये आपला २०० वा बळी पूर्ण केला.

शतकवीर डीन एल्गरला बाद करत जाडेजाने आफ्रिकेची जमलेली जोडी फोडली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जाडेजाने दुसरं स्थान पटकावलं आहे. केवळ ४४ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. यादरम्यान हरभजन, कुंबळे, चंद्रशेखर या दिग्गज गोलंदाजांना जाडेजाने मागे टाकलं आहे.

दरम्यान रविंद्र जाडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद २०० बळी घेणाऱ्या डावखुऱ्या गोलंदाजांच्या यादीतही अव्वल स्थान मिळवलं आहे.

दरम्यान रविचंद्रन आश्विनने तिसऱ्या दिवसापर्यंत ५ बळी घेत भारताची बाजू वरचढ ठेवली आहे.