Ind vs SA : ‘हिटमॅन’ चमकला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या कामगिरीशी बरोबरी

पहिल्या कसोटीत रोहितची दमदार शतकी खेळी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने शतक झळकावत आपण तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. सलामीवीर या नात्याने रोहितचं कसोटीमधलं हे पहिलं शतक ठरलं आहे, तर कसोटी कारकिर्दीत रोहितचं हे चौथं शतक ठरलं आहे. या कामगिरीसह रोहितने ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे.

भारतामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने ९८.२२ ची सरासरी गाठली आहे. १५ डावांमध्ये रोहित शर्माने ८८४ धावा केल्या आहेत, यामध्ये ४ शतकं आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. सर ब्रॅडमन यांनी घरच्या मैदानावर खेळताना ५० डावांनंतर ९८.२२ ची सरासरी गाठली होती. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सलामीला येऊन शतक झळकावणारा रोहित चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी शिखर धवन, लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांनी अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : दोन वर्षांपासून मी कसोटीत सलामीला येण्यासाठी तयार होतो – रोहित शर्मा

पहिल्या दिवशी झळकावलेल्या शतकाच्या जोरावर रोहित शर्मा कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सातवा फलंदाज ठरला आहे. याआधी ख्रिस गेल, ब्रँडन मॅक्युलम, मार्टीन गप्टील, तिलकरत्ने दिलशान, अहमद शेहजाद, शेन वॉटसन आणि तमिम इक्बाल यांनी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावलं आहे.

READ SOURCE