मुंबईकर रोहित शर्माने विशाखापट्टणम कसोटीत आक्रमक फलंदाजी करत, आपली कसोटी संघातली निवड सार्थ ठरवली आहे. लोकेश राहुलच्या अपयशी कामगिरीमुळे रोहितला भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं. रोहितने मिळालेल्या संधीचं सोन करत दोन्ही डावात शतक झळकावलं. या शतकी खेळीत रोहितने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत चौकार-षटकारांची आतषबाजी केली. पहिल्या डावात रोहितने ६ तर दुसऱ्या डावात ७ खणखणीत षटकार ठोकले.

या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१६ सालापासून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा आपलं अव्वल स्थान कायम राखून आहे. रोहितच्या नावावर आताच्या घडीला २३९ षटकार जमा आहेत. इतर संघातील कोणत्याही आक्रमक खेळाडूंना रोहितच्या जवळही जाता आलेलं नाहीये.

रोहितने पहिल्या डावात १७६ तर दुसऱ्या डावात १२७ धावा केल्या. कसोटीमध्ये सलामीवीर या नात्याने रोहितचं हे दुसरं शतक ठरलं आहे. तर कसोटी कारकिर्दीत त्याचं पाचवं शतक ठरलं आहे. कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा रोहित हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्यामुळे आगामी कसोटी सामन्यांमध्ये रोहित कसा खेळ करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.