मयांक अग्रवालचं द्विशतक आणि रोहित शर्माने झळकावल्या शतकाच्या जोरावर भारताने विशाखापट्टणम कसोटीत ७ गडी गमावत ५०२ धावांपर्यंत मजल मारली आहे. ५०० धावांचा पल्ला ओलांडल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. मयांक अग्रवाल माघारी परतल्यानंतर भारताच्या मधल्या फळीतले फलंदाज पुरते अपयशी ठरले. रविंद्र जाडेजा आणि हनुमा विहारीने झटपट धावा जमावत भारताला ५०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने ३, तर फिलँडर-पिडीट-मुथुस्वामी-एल्गर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, सलामीवीर मयांक अग्रवालने झळकावलेल्या द्विशतकाच्या जोरावर पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने धावांचा डोंगर उभा केला. दुसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंतच्या सत्रापर्यंत भारताने ५ गडी गमावत ४५० धावांपर्यंत मजल मारली होती. रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर मयांकने अन्य फलंदाजांना हाताशी धरत फटकेबाजी सुरु ठेवली. कसोटी क्रिकेटमधलं आपलं पहिलं शतक झळकावणाऱ्या मयांकने या शतकी खेळीचं द्विशतकी खेळीत रुपांतर केलं. त्याने ३७१ चेंडूत २१५ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत २३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. डीन एल्गरने मयांक अग्रवालला माघारी धाडलं.

भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पहिल्या डावात थोडीशी निराशा केली. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे फलंदाज झटपट माघारी परतले. मात्र मयांकने एक बाजू लावून धरली. त्याआधी, पहिल्या दिवशी बिनबाद २०२ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर, दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत भारताने रोहित शर्माच्या विकेटच्या मोबदल्यात ३२४ धावांपर्यंत मजल मारली. केशव महाराजने सकाळच्या सत्रात रोहित शर्माचा एकमेव बळी घेतला.

दुसऱ्या दिवशीही भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी आफ्रिकन गोलंदाजांवर प्रहार करायला सुरुवात केली. मयांक अग्रवालने ८४ धावांवरुन आपलं कसोटी क्रिकेटमधलं पहिलं शतक झळकावलं. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची भागीदारी केली. अखेरीस केशव महाराजच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित यष्टीचीत होऊन माघारी परतला. त्याने २४४ चेंडूत १७६ धावा केल्या. त्याच्या या खेळीत २३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.