दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात आफ्रिकेने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना, ५ गडी गमावत १४९ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार क्विंटन डी-कॉकच्या अर्धशतकी खेळामुळे पाहुणा आफ्रिकेचा संघ सामन्यात आश्वासक धावसंख्या उभारु शकला. डी-कॉकने ३७ चेंडूत ८ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली.

रेझा हेंड्रिग्ज माघारी परतल्यानंतर डी-कॉकने आफ्रिकेचा डाव सावरत आपलं अर्धशतक झळकावलं. मात्र त्याचा हा आनंद फारकाळ टिकला नाही. नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने डी-कॉकचा सुरेख झेल पकडत त्याला माघारी धाडलं. विराट कोहलीने घेतलेल्या या अफलातून झेलचं समालोचकांसह सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत होतं.

दरम्यान अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांनी धीम्या गतीने चेंडू टाकत आफ्रिकेच्या फलंदाजांवर अंकुश लावला. तरीही अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत आफ्रिकेने भारताला १५० धावांचं आव्हान दिलंच.