भारतीय संघाचा सलामीवीर मयांक अग्रवालने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळीची नोंद केली आहे. नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीत दोन शतकं झळकावणारा रोहित शर्मा पुणे कसोटीत झटपट माघारी परतला. यानंतर मयांक अग्रवालने चेतेश्वर पुजाराच्या साथीने शतकी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला.

मयांक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सलग शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. २००९/१० साली विरेंद्र सेहवागने सलग दोन शतकं झळकावली होती. मयांक अग्रवालने यंदाच्या हंगामात ही कामगिरी करुन दाखवली. मयांक अग्रवालने १९५ चेंडूंमध्ये १६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने १०८ धावा केल्या. अखेरीस कगिसो रबाडाने कर्णधार फाफ डु-प्लेसिसकरवी झेलबाद करत भारताला धक्का दिला.