दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुणे येथील कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाअखेरीस ३ गड्यांच्या मोबदल्यात २७३ धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीवीर मयांक अग्रवाल शतक झळकावल्यानंतर माघारी परतला, यानंतर कर्णधार विराट कोहलीने अजिंक्य रहाणेच्या साथीने आणखी एक भागीदारी रचत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. पहिल्या दिवसाअखेरीस विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावत ६३ धावा पटकावल्या.

या खेळीदरम्यान विराट कोहलीने भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धावांच्या निकषात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराटने सचिनला मागे टाकलं आहे. कर्णधार या नात्याने सचिनने ८ कसोटी सामन्यांत आफ्रिकेविरुद्ध भारताचं नेतृत्व केलं, ज्यामध्ये त्याने ५५३ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवसाअखेरीस झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विराटने ६०० धावांचा पल्ला गाठत सचिनचा विक्रम मोडला.

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताला आपलं पहिलं स्थान कायम राखायचं असल्यास या मालिकेत विजय मिळवणं गरजेचं आहे. मात्र पुण्याच्या गहुंजे मैदानातील अखेरच्या वन-डे आणि टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात विराटसेना कसा खेळ करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.