बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावरील अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजी आफ्रिकन माऱ्यासमोर कोलमडली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या विराट कोहलीचा निर्णय भारतीय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. सलामीवीर शिखर धवनचा अपवाद वगळता सर्व भारतीय फलंदाज तिसऱ्या टी-२० सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकले नाहीत. एकीकडे भारतीय फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत असताना शिखरने एक बाजू लावून धरत भारतीय डावाला आकार दिला.

शिखरने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत २५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३६ धावांची खेळी केली. यादरम्यान शिखर धवनने टी-२० क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीलाही न जमलेली कामगिरी करुन दाखवली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये (सर्व प्रकारच्या टी-२० स्पर्धा) शिखर ७ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना या फलंदाजांना ही कामगिरी करता आलेली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्याला सुरुवात होण्याआधी शिखर धवनला हा टप्पा ओलांडण्यासाठी अवघ्या ४ धावांची आवश्यकता होती. सध्या शिखर धवनच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ७ हजार ३२ धावा जमा आहेत.