दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय निवड समितीने लोकेश राहुलला संघातून डच्चू देत रोहित शर्माला संधी दिली. रोहितनेही आपल्याला मिळालेल्या संधीचं पुरेपूर सोनं करत, कसोटी मालिकेतलं तिसरं शतक झळकावलं. विशाखापट्टणम कसोटीत रोहितने पहिल्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावलं होतं. रांची कसोटीत अजिंक्य रहाणेसोबत रोहितने द्विशतकी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. या खेळीदरम्यान रोहित शर्माने भारताचा वनवास अखेरीस संपवला आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : ‘हिटमॅन’चा तडाखा सुरुच, सचिन-सेहवाग-कोहलीच्या पंगतीत मिळवलं स्थान

कसोटी मालिकेत सलामीवीर रोहितने ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. २००५ साली पाकिस्तानविरुद्ध मालिकेत सेहवागने सलामीला येत ५०० पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. यानंतर तब्बल कोणत्याही भारतीय सलामीवीराला ही कामगिरी करता आलेली नव्हती. अखेरीस तब्बल १४ वर्षांनी रोहित शर्माने ही कामगिरी करुन दाखवली आहे.

याचसोबत रोहित शर्माने विनू मंकड, बुधी कुंदरन, सुनिल गावसकर, विरेंद्र सेहवाग या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. या सर्व खेळाडूंनी कसोटी मालिकेत सलामीवीर या नात्याने ५०० धावा पटकावल्या होत्या. गावसकरांनी कसोटी मालिकेत अशी कामगिरी तब्बल ५ वेळा केली होती. त्यामुळे उरलेल्या सत्रात रोहित कसा खेळतो याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : रोहित शर्माने सलामीचा प्रश्न सोडवला, फलंदाजी प्रशिक्षकांकडून पोचपावती