सलामीवीर रोहित शर्माचं द्विशतक, त्याला अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करत दिलेली उत्तम साथ आणि तळातल्या फलंदाजांनी केलेल्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर भारताने रांची कसोटीत आपला पहिला डाव ४९७ डावांवर घोषित केला. खराब सुरुवातीनंतरही भारताने आता सामन्यावर आपली पकड घट्ट केली. भारतीय फलंदाजांनी आफ्रिकन गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. रोहित आणि अजिंक्य माघारी परतल्यानंतर तळातल्या फळीमध्ये रविंद्र जाडेजा, वृद्धीमान साहा, उमेश यादव यांनी फटकेबाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.

यामध्ये रोहित आणि अजिंक्य रहाणेने फटकेबाजी केल्यानंतर, उमेश यादवनेही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. आफ्रिकेच्या फिरकीपटूंवर प्रहार करत उमेशने १० चेंडूत ३१ धावांची खेळी केली. महत्वाची गोष्ट म्हणजे या ३१ धावांपैकी ३० धावा या उमेशने केवळ षटकारांच्या जोरावर कमावल्या आहेत. उमेशच्या या फटकेबाजीमुळे उपस्थित प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन झालं. १० किंवा अधिक चेंडूचा सामना केल्यानंतर उमेशने ३१० च्या स्ट्राईक रेटने केलेल्या ३१ धावा या कसोटी क्रिकेटमधल्या सर्वोत्तम ठरल्या आहेत.

याचसोबत उमेश यादवने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशीही बरोबरी केली. फलंदाजीसाठी मैदानात आल्यानंतर उमेशने पहिल्याच दोन चेंडूवर षटकार खेचले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच दोन चेंडूवर षटकार लगावणारा उमेश तिसरा खेळाडू ठरलाय. याआधी १९४८ साली फॉली विल्यम्स यांनी इंग्लंडविरुद्ध तर २०१३ साली सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

दरम्यान, भारताने आपला पहिला डाव ४९७ धावांवर घोषित केल्यानंतर आफ्रिकेची सलामीची जोडी मैदानात आली. मात्र मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी खेळपट्टीचा फायदा घेत उसळी चेंडू टाकत आफ्रिकेच्या फलंदाजांना हैराण केलं. अखेरीस डीन एल्गर आणि क्विंटन डी-कॉक भारताच्या जाळ्यात अडकले. यानंतर पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला, यावेळी दक्षिण आफ्रिकेची अवस्था २ गडी बाद ९ अशी झाली होती. आफ्रिकेचा संघ सामन्यात अद्यापही ४८८ धावांनी पिछाडीवर आहे.