भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची कसोटी सामन्यात दिमाखदार कामगिरी करत, भारताच्या आणखी एका निर्भेळ यशावर शिक्कामोर्तब केलं आहे. पहिल्या डावात रोहित शर्माचं द्विशतक आणि अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ४९७ डावांपर्यंत मजल मारली. यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव भारताने १६२ धावांवर संपवला. उमेश यादवने ३ तर मोहम्मद शमी-शाहबाद नदीम आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी २-२ बळी घेतले.

पुण्याच्या गहुंजे मैदानावर उमेश यादवला संधी मिळाली. ज्या संधीचं उमेशने सोनं केलं. तिसऱ्या कसोटी सामन्यातही उमेशने आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं. या कामगिरीसह उमेश यादव घरच्या मैदानावर शेवटच्या सलग पाच डावांमध्ये ३ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी विंडीजचे दिग्गज गोलंदाज कर्टनी वॉल्श यांनी भारताविरुद्ध अशी कामगिरी केली होती.

घरच्या मैदानावर गेल्या पाच डावांमधली उमेश यादवची कामगिरी –

६/८८, ४/४५, ३/३७, ३/२२, ३/४०*

दरम्यान पहिल्या डावात आफ्रिकेचा डाव १६२ धावांवर संपल्यानंतर विराट कोहलीने आफ्रिकेला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही आफ्रिकेची खराब सुरुवात झाली आहे. आफ्रिकेचे ४ फलंदाज हे ५० धावांच्या आतच माघारी परतले आहेत.