सलामीवीर रोहित शर्माने झळकावलेल्या द्विशतकी खेळाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताचे ३ फलंदाज झटपट माघारी परतले होते. मात्र रोहित शर्माने आपला मुंबईकर साथीदार अजिंक्य रहाणेच्या साथीने द्विशतकी भागीदारी केली. २१२ धावांवर रोहित कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर एन्गिडीकडे झेल देऊन माघारी परतला. या खेळीदरम्यान रोहितने ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडला आहे.

घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने ९९.८४ इतक्या सरासरीची नोंद केली आहे. रोहितने यादरम्यान डॉन ब्रॅडमन यांचा ९८.२२ च्या सरासरीचा विक्रमही मोडला.

दरम्यान षटकाराच्या सहाय्याने आपलं द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

रोहित शर्माने २५५ चेंडूत २८ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने २१२ धावांची खेळी केली. दरम्यान आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत रोहितने सलामीवीर या नात्याने ५०० धावांचा टप्पाही पूर्ण केला.

अवश्य वाचा – Ind vs SA : रोहितने भारताचा वनवास संपवला, सेहवागनंतर अनोखी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज