भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून (शनिवार) रांचीमध्ये सुरु झाला. भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र विराटने नाणेफेक जिंकल्याने सामाना सुरु होण्याआधीच आफ्रिकेने खेळलेली पहिली चाल फसली आहे.

आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस हा आशियात खेळल्या गेलेल्या मागच्या ९ कसोटी सामन्यात सलग नाणेफेक हरलेला आहे. त्यामुळे आफ्रिकेच्या मागे लागलेले हे शुक्लकाष्ट संपवण्यासाठी कर्णधाराबरोबरच संघाने उपकर्णधार टेम्बा बावुमाला नाणेफेकीसाठी पाठवले होते. मात्र त्याचाही आफ्रिकेला काही फायदा झाल्याचे चित्र दिसत नाही. विराटने नाणेफेक करत नाणे उसळले तेव्हा बावुमाने हेड्स (छापा) असं म्हटलं. मात्र नाणे जमीनीवर पडले तेव्हा टेल्स (काटा) दर्शवत होते. नाणेफेक जिंकल्यानंतर विराटबरोबरच डु प्लेसिसही हसू आवरता आले नाही. डु प्लेसिसने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सात कसोटी सामन्यात सात वेळा नाणेफेक जिंकली होती. मात्र परदेशी मैदानावर खेळताना मागील सातही वेळेस तो नाणेफेक हरला आहे.

दरम्यान, या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले. त्यामुळे शेवटचा सामना जिंकून लाज राखण्याचे आव्हान आफ्रिकेच्या संघापुढे आहे. त्यासाठी आफ्रिकेचा संघ कसून सराव करत आहे. त्यातच आफ्रिकेच्या संघ एक अनोखा निर्णय घेण्याची शक्यता आहे. इतर कोणता तरी खेळाडू येण्याची शक्यता आहे.