बंगळुरुच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय पुरता फसला. शिखर धवनचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज आफ्रिकेच्या माऱ्यासमोर टिकू शकला नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ऋषभ पंतनेही या सामन्यात निराशा केली. केवळ १९ धावा काढून तो माघारी परतला. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने, पंतच्या शैलीतली चूक काढत त्याला लवकरात लवकर शैली सुधारण्याचा सल्ला दिला आहे.

“चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजाने सर्वात आधी एक-एक धाव काढत डावाला आकार देण्याचा प्रयत्न करायचा असतो. पंतला हे जमत नाहीये. पंत आपले बरेचसे फटके हे लेग साईडच्या दिशेने खेळतो. याचाच अर्थ त्याची ऑफ साईड कमजोर आहे. त्याची ही कमकुवत बाजू आतापर्यंत प्रतिस्पर्ध्यांच्या सहज लक्षात आलेली असणार. ऋषभ पंत प्रतिभावान खेळाडू आहे, पण त्याने जर आपल्या कमकुवत बाजूंवर काम केलं नाही आणि प्रतिस्पर्ध्यांसमोर असाच खेळत राहिला तर तो संघात फारकाळ टिकणार नाही.” लारा सामन्यात समालोचनादरम्यान बोलत होता.

अवश्य वाचा – पंतला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवा – व्ही.व्ही.एस.लक्ष्मण

गेल्या काही सामन्यांमध्ये ऋषभ पंतची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. विंडीज दौऱ्यात अखेरच्या टी-२० सामन्यात केलेली अर्धशतकी खेळी वगळता ऋषभ सतत अपयशी ठरतो आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनीही ऋषभ पंतच्या फलंदाजीतील कामगिरीबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती. टी-२० मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत ऋषभची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.